दुर्गामाता दौडला उद्यापासून होणार प्रारंभ
धारकऱ्यांमध्ये अपूर्व उत्साह : शिवरायांचा होणार जयघोष
बेळगाव : देव, देश आणि धर्माच्या रक्षणासाठी चाललेल्या दुर्गामाता दौडला गुरुवार दि. 3 ऑक्टोबरपासून प्रारंभ होणार आहे. यामुळे धारकऱ्यांसह बालकांमध्ये दौडबाबत उत्सुकता वाढली आहे. शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानतर्फे योग्य ती तयारी केली असून दौडबाबतचे नियम पाळून शांततेत सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. शहरासह उपनगरांमध्ये दौडची व्यापकता वाढू लागली आहे. देशप्रेमाची चेतना जागविणाऱ्या दुर्गामाता दौडला उत्साहात प्रारंभ होणार आहे. गुरुवारी पहिल्या दिवशी शिवाजी उद्यान येथे पहाटे विधिवत पूजा, आरती आणि प्रेरणामंत्राने या ऐतिहासिक दौडला सुरुवात होणार आहे. त्यानंतर पहिल्या दिवशीच्या मार्गावर ही दौड मार्गस्थ होणार आहे. याकरिता मार्गस्थ रस्त्यांवर बुधवारी तयारी केली जाणार आहे.
गुरुवार दि. 3 ऑक्टोबर रोजी पहिल्या दिवशीचा दौडचा मार्ग ...
श्री छत्रपती शिवाजी उद्यानातून दौडला प्रारंभ होणार आहे. पुढे हुलबत्ते कॉलनी, महात्मा फुले रोड, संतसेना रोड, पाटीदार भवन रोड, शास्त्रीनगर, गुड्सशेड रोड, कपिलेश्वर कॉलनी, शास्त्रीनगर, आठल्ये रोड, महाद्वार रोड क्रॉस नं. 4, माणिकबाग रोड, समर्थनगर, महाद्वार रोड क्रॉस नं. 2 व 3, संभाजी गल्ली, एसपीएम रोडमार्गे कपिलेश्वर मंदिरात सांगता होणार आहे.
दुर्गामाता दौडीत सहभागींनी पाळावयाची शिस्त आणि नियम
- दौडीचा ध्वजधारी व शस्त्र पथकामध्ये सहभागी असणारा प्रत्येक जण हिंदवी स्वराज्य खडा पहारा योजनेमध्ये नाव नोंदणी केलेला व संघटनेच्या प्रत्येक उपक्रमात सहभागी असणारा हवा.
- ठरलेल्या वेळी आणि ठरलेल्या ठिकाणी दौडीच्या सुरुवातीपासूनच दौडीत सामील व्हावयाचे आहे.
- प्रत्येकाने डोक्यावर शिरस्त्राण म्हणून वारकरी/पांढरी टोपी किंवा भगवा फेटा घातलाच पाहिजे.
- दौडीची सुरुवात प्रेरणामंत्र व आरतीने होईल.
- इतर संघटना/संस्था/मंडळे यांची टी-शर्ट्स किंवा टोपी घालू नये. श्री दुर्गामाता दौड हा भेद वाढविणारा नाही तर भेद मिटविणारा उपक्रम आहे.
- दौडीत सामाजिक आणि राष्ट्रीय संदेश देणारी गीते/गुरुजी लिखित श्लोक खड्या आवाजात म्हणावयाचे आहेत.
- ठरलेले पवित्र उद्घोष/घोषणाच द्याव्यात, अवांतर घोषणाबाजी चालणार नाही.
- शिस्त आपल्या कार्याचा प्राण आहे, त्यामुळे समाजाभिमुख होताना ती काटेकोरपणे पाळणे सर्वांचे कर्तव्य आहे.
- चंगळवाद/टोळकेपणा/हुल्लडबाजी आपापसात बोलत जाणे अजिबात चालणार नाही.
- स्वत: शिस्त पाळून इतरांना ती पाळावयास लावणे आणि उपरोक्त नियमांचे उल्लंघन होण्यास मज्जाव करणे हे दौडीत सहभागी होणाऱ्या प्रत्येकाचे काम आहे.
- आपले वरिष्ठ/प्रमुख धारकरी ज्याप्रमाणे मार्गदर्शन करतील तसे करण्यास कोणत्याही प्रकारचा संकोच असता कामा नये.
- दौड संपल्यानंतर त्याच वेशभूषेमध्ये फोटोशूटसाठी किंवा कोठेही बाहेर फिरायला जाऊ नये.
- काहीतरी गैरप्रकार करून दौडीत बेशिस्तपणा आणण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर योग्य ती कारवाई केली जाईल.