मालवणात दुर्गामाता दौड उत्साहात
मालवण । प्रतिनिधी
हिंदवी स्वराज्य व्हावे ही श्रींची इच्छा होती. त्याच प्रमाणे यामागे माता जिजाऊंचे मोठे योगदान होते. माता जिजाऊंनी छत्रपती शिवरायांना घडविले आणि शिवरायांच्या रूपाने देशाला धर्मरक्षक मिळाला. शिवाजी दुसऱ्याच्या घरात जन्माला येऊदे अशी आज मानसिकता तयार होत असताना. त्याकाळी जिजाऊंनी केलेला त्याग आपणास प्रकर्षाने दिसून येतो. आणि याचमुळे माता जिजाऊ याच खऱ्या अर्थाने इतिहासातल्या दुर्गा ठरतात. असे प्रतिपादन ,शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान चे जिल्हा अध्यक्ष मंगेश पाटील यांनी केले.राजमाता जिजाऊ आणि दुर्गा मातेचे स्मरण करण्यासाठी मालवण शहरात मंगळवारी सकाळी 'दुर्गा माता दौड' आयोजित करण्यात आली होती. या दौडला सकाळी ८ वाजता मालवण भरड येथील भरड नवरात्रौत्सव मित्रमंडळाच्या दुर्गा मातेचे पूजन करून सुरुवात करण्यात आली. पांढऱ्या व भगव्या रंगाचे वेश परिधान करून या दौड हिंदू बांधव व भगिनी सहभागी झाले होते. भरड येथून बाजारपेठ मार्गे ही दौड निघून बंदर जेटी येथे विसर्जित झाली. जय श्री राम... जय जिजाऊ... जय भवानी... जय शिवाजी... भारत माता की जय अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या.राजमाता जिजाऊ यांनी छत्रपती शिवाजी महाराज त्यांच्या पोटात असताना नवरात्रीचे नऊ दिवस उपवास करून देवीकडे 'देव, देश आणि धर्माचे रक्षण' करणाऱ्या बालकाला जन्म देण्याचे साकडे घातले होते. दुर्गा मातेने जिजाऊंची ही इच्छा पूर्ण केली आणि याच कारणामुळे छत्रपती शिवरायांमुळे आपण आज हिंदू म्हणून आपले धार्मिक कार्यक्रम साजरे करू शकतो. तसेच मालवण शहरत भगवा ध्वजस्तंभ उभारूया व पुढच्या वेळी भव्य स्वरूपात दुर्गा माता दौड आयोजित करूया, असेही यावेळी श्री. मंगेश पाटील म्हणाले.यावेळी शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान प्रतिष्ठानचे समीर गवस, विकास गडकर, विश्व हिंदू परिषदेचे तालुका अध्यक्ष भाऊ सामंत, शिवराज मंचचे भूषण साटम, विहिंपचे जिल्हा समरसता विभाग उपाध्यक्ष संदीप बोडवे, स्वराज्य संघटनेच्या सौ. शिल्पा खोत, सौ. पूजा सरकारे, विलास हडकर, शेखर मुणगेकर, अप्पा लुडबे, सुशांत तायशेटे, गणेश चव्हाण, श्रीराज बांदेकर, रवींद्र खानविलकर, अनिकेत फाटक, ललित चव्हाण, हरेश फडते, दादा वेंगुर्लेकर, ऋत्विक सामंत, समीर शिंदे, कल्पिता जोशी, अमृता फाटक, अंजना सामंत, शांती तोंडवळकर, अश्विनी आचरेकर यांच्यासह विश्व हिंदू परिषद, शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, बजरंग दल, सनातन, स्वराज्य संघटना आदी संस्थांचे सदस्य तसेच सकल हिंदू समाजातील महिला व पुरुष सहभागी झाले होते.