उचगाव परिसरात दुर्गामाता दौडला प्रारंभ
ध्येयमंत्र, प्रेरणामंत्राने, बोल बजरंग बली की जयच्या घोषणांनी परिसर दुमदुमला
वार्ताहर/उचगाव
‘आम्ही गड्या उचगावचे राहणारं चाकर शिवबाचे होणार’ ‘तुमचे आमचे नाते काय जय भवानी जय शिवराय’ ‘बोल बजरंग बली की जय’ अशा घोषणा, मार्गावर फुलांचा सडा, रांगोळ्या, भगव्या पताका आणि भगवी, पांढरेशुभ्र वस्त्रे, परिधान करून भगव्या ध्वजाची आरती करणाऱ्या महिला अशा भगव्यामय वातावरणात उचगाव परिसरातील उचगाव, कोनेवाडी, बसुर्ते, तुरमुरी, बेकिनकेरे, अतिवाड, कल्लेहोळ, सुळगा या गावांमध्ये गुरुवारी दुर्गामाता दौडचे उद्घाटन उत्साही वातावरणात झाले. उचगाव गांधी चौकातील गणेश विठ्ठल-रखुमाई मंदिराच्या प्रांगणातून सकाळी सहा वाजता दुर्गामाता दौडला प्रारंभ झाला. यावेळी गणपत गल्ली, छत्रपती शिवाजी महाराज चौक, मळेकरणी देवस्थान मार्ग, चव्हाट गल्ली, लक्ष्मी गल्ली, अनगोळ गल्ली, आंबेडकर नगर, मारुती गल्ली, नागेश नगर अशा विविध भागांमध्ये दौडचे प्रस्थान झाले. पुन्हा गणेश विठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या प्रांगणात ध्येयमंत्र, प्रेरणामंत्र होऊन दौडची सांगता झाली. दौडमध्ये बालकांपासून मोठ्यापर्यंतचा सहभाग होता.
तुरमुरी
तुरमुरी येथील दुर्गामाता दौडची सुरुवात धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज मूर्ती समोरून करण्यात आली. दौड अळवंत गल्ली, माऊती गल्ली, आंबेडकर गल्ली, विष्णू गल्ली, छत्रपती शिवाजी गल्ली, चव्हाट गल्ली, रामलिंग गल्ली, रामेश्वर नगर या भागात फिरून धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज मूर्तीच्या प्रांगणात सांगता केली. यावेळी शिवज्योत ग्रामीण पतसंस्था तसेच प्रत्येक गल्लीतर्फे दौडचे स्वागत करण्यात आले. प्रसादाचे वाटपही करण्यात येत होते. दौडमध्ये लहान-थोर व युवक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
‘अतिवाड’
अतिवाड गावच्या प्रवेशद्वारामध्ये छत्रपती शिवाजी महाराज चौकातील शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे पूजन करून दुर्गामाता दौडला प्रारंभ केला. दौड लक्ष्मी मंदिर, ब्रह्मलिंग मंदिर, मारुती मंदिर व इतर सर्व मंदिरापर्यंत प्रमुख गल्ल्यामधून काढून मारुती मंदिराच्या प्रांगणात सांगता करण्यात आली. दौडमध्ये युवक, युवती मोठ्या संख्येने सहभागी होते.
‘बेकिनकेरे’
बेकिनकेरे येथील गणेश मंदिराच्या प्रांगणात गणेश मूर्तीच्या पूजनाने दुर्गामाता दौडचा शुभारंभ केला. दौडीतील युवक, युवतीने पांढरा पोशाख परिधान करून दौड गावातील प्रमुख मार्गावरून काढून मरगाई मंदिर, नागनाथ मंदिर येथे पूजन करून शिवाजी महाराजांच्या मूर्तीच्या पूजनाने दौडची सांगता करण्यात आली. दौडमुळे गावात नवचैतन्य निर्माण झाल्याचे सर्वत्र दिसून येत होते.