For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

दरबार गल्ली-रमजानचा रंग अन् ऐतिहासिक वारसा

11:24 AM Feb 28, 2026 IST | Tarun Bharat Portal
दरबार गल्ली रमजानचा रंग अन् ऐतिहासिक वारसा
Advertisement

इतिहास, धर्म, व्यापार आणि रमजानची शान! : पूर्वी येथे महत्त्वाच्या सभा, बैठका होत असल्याने मिळाले दरबार गल्ली नाव

Advertisement

दरबार गल्ली बेळगाव शहराच्या मध्यवर्ती भागात स्थित आहे. आपण जर बेळगाव शहर बसस्थानकावर असाल, तर येथे पोहोचण्यासाठी अवघे एक कि. मी. अंतर पार करावे लागते. ही गल्ली सुमारे चारशे मीटर लांब असून येथे प्रसिद्ध वस्त्रदुकाने, खाद्यपदार्थ विव्रेते आणि ऐतिहासिक इमारती पाहावयास मिळतात.

‘दरबार’ शब्दाचा इतिहास

Advertisement

‘दरबार’ हा शब्द फारसी भाषेतून आलेला असून, त्याचा अर्थ राजदरबार किंवा शाही सभा असा होतो. ऐतिहासिकदृष्ट्या, दरबार हा शब्द राजे, नवाब, सुलतान किंवा सम्राट यांच्या सभा किंवा सत्ता स्थापनेसाठी वापरण्यात येत असे. असे मानले जाते की पूर्वी येथे महत्त्वाच्या सभा आणि बैठकींचे आयोजन केले जात असे. त्यामुळे या ठिकाणाला दरबार गल्ली हे नाव मिळाले.

जामिया मशीद धार्मिक अन् वास्तुशिल्प वारसा

जामिया मशीद, बेळगाव ही दरबार गल्लीत स्थित असून बेळगावातील सर्वात जुनी आणि प्रसिद्ध मशिदींपैकी एक आहे. धार्मिकदृष्ट्या महत्त्वाची असण्याबरोबरच ही मशीद आपल्या सुंदर वास्तुशिल्पासाठीही प्रसिद्ध आहे. तसेच येथून जवळच असलेल्या भेंडी बाजारातील बशिबान दर्गासुद्धा आदिलशाही काळापासून अस्तित्वात असल्याने याचेसुद्धा महत्त्व या परिसरात अधिक आहे. येथील डॉ. हाफिज इनामदार यांच्या घरात एक भव्य हॉल होता. त्या हॉलमध्ये पूर्वी दरबार गल्ली, कोतवाल गल्ली, जालगार गल्ली आणि शेट्टी गल्लीतील पंच मंडळींच्या बैठका पार पडत असत. या बैठकीत समाजातील विविध सामाजिक प्रश्नावरआणि समस्यांवर तोडगा काढला जात असे. तसेच हिंदूंच्या गणेश चतुर्थीच्यावेळी या गल्लीतील जांगळे बंधू, नाईक बंधू यांच्यासोबत मुस्लीम धर्मीयही एकत्र सण साजरा करत असत असे येथील राहिवाशांकडून सांगितले जाते.

ब्रिटिश काळातील महत्त्व

ब्रिटिश काळात बेळगाव हे एक महत्त्वाचे लष्करी आणि प्रशासकीय केंद्र होते. त्यामुळे दरबार गल्लीच्या आसपास ब्रिटिश इमारती, न्यायालये आणि व्यापारी वसाहती निर्माण झाल्या. ही गल्ली अनेक ऐतिहासिक घडामोडींची साक्षीदार राहिली आहे. पूर्वी या गल्लीतील नागरिक नोकरी-पेशात कार्यरत होते. येथे कापड, धान्य, मसाले आणि हस्तकला यांचा मोठ्या प्रमाणावर व्यापार चालत असे. गत दहा वर्षांपासून सुरू झालेल्या कॉम्प्लेक्स प्रणालीमुळे परिसरात अनेक कापड दुकानदार, कोचिंग क्लासेस, प्लेसमेंट सर्व्हिसेस, किराणा दुकाने व हॉटेल व्यावसायिकांनी आपली आस्थापने थाटली असून येथील व्यवसायाची भरभराट झाली आहे.

महिलांच्या वस्त्रांसाठी प्रसिद्ध बाजारपेठ

दरबार गल्ली महिलांच्या वस्त्रप्रावरणांसाठी सर्वत्र सुप्रसिद्ध आहे. येथे साड्या, सलवार-कुर्ते, डिझायनर डेस आणि पारंपरिक पोशाख यांचे मोठे मार्केट आहे. येथील कपडे खरेदी करण्यासाठी बेळगावसह गोवा, सिंधुदुर्ग, चंदगड, आजरा तसेच परिसरातील इतर गावांमधून अनेक नागरिक भेट देत असतात. त्यामुळे ही गल्ली महिलांच्या वस्त्रखरेदीसाठी खास मानली जाते.

लाल बहादूर शास्त्री चौक

भारताचे माजी पंतप्रधान लाल बहाद्दूर शास्त्री हे महान देशभक्त.त्यांनी आपल्या कुटुंबापेक्षा देशसेवेला अधिक महत्त्व देत देशसेवा केली. त्यांच्या या देशभक्तीमुळे प्रेरित होऊन, येथील नागरिकांकडून त्याकाळी या दरबार गल्लीत स्थित असलेल्या चौकाचे लाल बहादूर शास्त्री चौक असे नामकरण करण्यात आले, असे येथील ज्येष्ठ नागरिक सांगतात.

रमजान आणि मोहरममधील सांस्कृतिक एकात्मता

विशेषत: रमजान महिन्यात दरबार गल्ली वेगळ्याच रूपात दिसते. या परिसरात प्रसिद्ध रमजान फूड स्ट्रीट भरतो, जिथे स्वादिष्ट बिर्याणी, कबाब, शीर खुरमा, फिरनी तसेच विविध पारंपरिक शाकाहारी व मांसाहारी पदार्थांची चव चाखण्यासाठी परिसरातील आणि सर्व समाजातील असंख्य लोक आवर्जुन भेट देतात. तसेच या भागात मोहरम सणही गांभीर्याने पाळला जातो. मोहरमनिमित्त येथे काढण्यात येणारी पंजे मिरवणूक शहरातील विविध मार्गांवरून नेली जाते. यावेळी अनेक हिंदू धर्मीय लोकही या पंजाचे दर्शन घेऊन उपवास करतात. असा हा हिंदू-मुस्लीम ऐक्मयाचा सण अनेक वर्षांपासून येथे साजरा केला जात आहे.

2016 मधील रस्ता रुंदीकरण प्रकल्प

2016 मध्ये या गल्लीत रस्ता रुंदीकरणाचा प्रकल्प तात्कालीन बेळगाव उत्तरचे आमदार फिरोज सेठ यांच्यावतीने हाती घेण्यात आला. छोटे रस्ते मोठे झाल्याने या भागातील अनेक व्यवसायांना झळाळी प्राप्त झाली. दुकानदारांना अधिक व्यवसायाची संधी मिळाली आणि लोकांसाठी खरेदी व प्रवास अधिक सोयिस्कर झाला. आजही दरबार गल्ली ही बेळगावच्या ऐतिहासिक, धार्मिक आणि व्यापारी ओळखीचा अविभाज्य भाग आहे. येथे विविध धर्म, परंपरा आणि संस्कृती एकत्र नांदत असून, ही गल्ली शहराच्या एकात्मतेचे प्रतीक म्हणून ओळखली जाते.

Advertisement
Tags :

.