ड्युरँड चषक फुटबॉल स्पर्धा 23 जुलैपासून
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
134 व्या ड्युरँड चषक राष्ट्रीय प्रतिष्ठेची आणि सर्वात जुनी फुटबॉल स्पर्धा येथे 23 जुलैपासून खेळविली जाणार आहे. आशिया खंडातील ही सर्वात जुनी स्पर्धा म्हणून ओळखली जाते.
सदर स्पर्धा 23 जुलै ते 23 ऑगस्ट दरम्यान होणार आहे. या स्पर्धेत एकूण 24 संघांचा समावेश राहील. ही स्पर्धा पाच विविध राज्यांमध्ये खेळविली जाईल. स्पर्धेत सहभागी होणारे 24 संघ सहा गटात विभागले जातील. पश्चिम बंगाल, झारखंड, मणिपूर, मेघालय आणि आसाम राज्यामध्ये या स्पर्धेतील सामने खेळविले जातील. भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांच्या हस्ते या स्पर्धेच्या चषकाचे अनावरण करण्यात आले. शुक्रवारी राष्ट्रपती भवनात आयोजिलेल्या समारंभामध्ये राष्ट्रपतीने या स्पर्धेतील चषकांचे अनावरण केले. भारतीय सेनादलातर्फे हा कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमाला भारताचे तिन्ही लष्करप्रमुख उपस्थित होते.