For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

टाकाऊतून टिकाऊ

06:19 AM Aug 23, 2026 IST | Tarun Bharat Portal
टाकाऊतून टिकाऊ
Advertisement

भंगारात काढलेल्या वस्तूंपासून टिकाऊ आणि उपयुक्त वस्तू बनविणे, ही एक महत्वाची कला आहे. अनेकांनी हे कौशल्य विकसीत केलेले असते. ब्राझील या देशात एक माता आणि तिची कन्या यांनी तर या संदर्भात एक विक्रमच केला आहे. त्यांनी त्यांचे संपूर्ण घरच टाकाऊ बाटल्यांपासून निर्माण केले आहे. या दोघीही कचरा गोळा करण्याचे काम करतात. लोकांनी कचऱ्यात फेकलेल्या मद्याच्या किंवा अन्य प्रकारच्या बाटल्या गोळा करुन त्यांच्यापासून त्यांनी आपले राहते घर निर्माण केले आहे. त्यांच्या कल्पनाशक्तीचे सोशल मिडियावरुन कौतुक होत आहे.

Advertisement

त्यांचे घर केवळ कचऱ्यातील बाटल्यांपासूनच बनले आहे असे नाही. कचऱ्यात सापडणाऱ्या लाकडी पॅलेटस् आणि तुकडे यांचा कल्पक उपयोग करुन त्यांनी आपल्या घराचे काही भाग निर्माण केले आहेत. तसेच टूथपेस्टच्या रिकाम्या ट्यूब्जच्या साहाय्याने त्यांनी या घराचे छत निर्माण केले आहे. एडना डँटास असे या मातेचे नाव असून कन्येचे नाव मारिया असे आहे. दोन वर्षे त्यांनी कचरा गोळा करुन रिकाम्या बाटल्या आणि इतर टाकाऊ वस्तूंचा संग्रह केला आणि या कच्च्या मालापासून आपल्या घराची निर्मिती केली. घराच्या भिंती बनविण्यासाठी त्यांनी सहस्रावधी रिकाम्या बाटल्यांचा उपयोग केला आहे. केवळ घराची निर्मिती करुन त्या थांबलेल्या नाहीत. मारिया डँटास यांनी आता कचऱ्यातील वस्तूंपासून कलात्मक उपयुक्त वस्तू बनविण्याचे एक उत्पादन केंद्र स्थापन केले आहे. या केंद्रात अनेकांना सन्मानजनक रोजगार मिळाला आहे. इतरांनी गोळा केलेला कचराही या केंद्रात विकत घेतला जातो आणि त्यातील उपयुक्त वस्तूंपासून कलात्मक वस्तू निर्माण केल्या जातात. या दोघींनी निर्माण केलेले घर सात खोल्यांचे आहे. त्यांनी प्रथम एका खोलीचे बांधकाम केले. या खोलीत त्यांनी कपडे शिवण्याचा व्यवसाय थाटला. समुद्रानजीकच्या बीचवर असंख्य लोक येतात. तेथे ते मद्यपान करुन बाटल्या तेथेच फेकतात. यामुळे बीचवरचे पर्यावरण बिघडते आणि अस्वच्छता निर्माण होते. हे टाळण्यासाठी या आईने आपल्या कन्येसह ज्या कल्पकतेचा परिचय दिला आहे, ती अत्यंत कौतुकास्पद आहे. हा आदर्श सर्वांनी स्वीकारावयास हवा, अशा प्रतिक्रिया सोशल मिडियावर व्यक्त केल्या जात आहेत.

Advertisement
Advertisement
Tags :

.