‘दुपहिया’ वेबसीरिज येतेय
धडकपूर गावाची कहाणी दिसणार
ओटीटी चाहत्यांदरम्यान काही सीरिजची चर्चा नेहमीच होत असते. यात पंचायत या सीरिजचे नाव अवश्य घेतले जाते. या सीरिजचे तीन सीझन प्रदर्शित झाले असून लोक आता आगामी सीझनची प्रतीक्षा करत आहेत. जितेंद्र कुमार, नीना गुप्ता आणि फैसल मलिक यांची मुख्य भूमिका असलेल्या पंचायत सीरिजमध्ये गावाची कहाणी दाखविण्यात आली असून ती प्रेक्षकांची मने जिंकणारी सीरिज ठरली आहे. आता प्राइम व्हिडिओवर ग्रामीण पार्श्वभूमी दाखविणारी आणखी एक सीरिज प्रदर्शित होणार आहे. अमेझॉन प्राइम व्हिडिओने दुपहिया वेबसीरिजची घोषणा केली आहे. छोट्या गावाची अनोखी कहाणी यात दाखविली जाईल. या सीरिजमध्ये गजराज राव आणि रेणुका शहाणे हे दिग्गज कलाकार दिसून येतील. दुपहिया या सीरिजमध्ये काल्पनिक गाव धडकपूरची कहाणी दाखविण्यात येणार आहे. धडकपूर नावाच्या गावात 25 वर्षे गुन्हेमुक्त राहिल्याचा जल्लोष केला जात असतो, परंतु गावात एका दुचाकीची चोरी झाल्यावर समस्या उभी ठाकते. यानंतर पूर्ण गाव मिळून ही दुचाकी शोधण्यासाठी बाहेर पडते. या घटनेनंतर पूर्ण गावात अफरातफरीचे वातावरण दिसून येते. अमेझॉन प्राइम व्हिडिओच्या या सीरिजचे 9 एपिसोड्स असतील आणि 7 मार्चपासून ही सीरिज पाहता येणार आहे. प्राइम व्हिडिओने याचे पोस्टर जारी केले आहे. या सीरिजच्या दिग्दर्शनाची जबाबदारी सोनम नायर यांनी पार पाडली आहे.