पंपसेट चोरणाऱ्या जोडगोळीला अटक
मारिहाळ पोलिसांकडून 12 पंपसेट, केबल वायर, मोटारसायकल जप्त
त. भा. प्रतिनिधी / बेळगाव
विहिरी व कॅनॉलवरील पंपसेट चोरणाऱ्या एका जोडगोळीला अटक करून त्यांच्याजवळून 3 लाख 60 हजार रुपये किमतीचे 12 पंपसेट व 300 मीटर केबल वायर, चोरीसाठी वापरलेली एक मोटारसायकल पोलिसांनी जप्त केली आहे. मारिहाळ पोलिसांनी ही कारवाई केली आहे.
गुडदाप्पा निंगाप्पा तळवार (वय 36) राहणार तुम्मरगुद्दी, ता. बेळगाव, कल्लाप्पा लक्काप्पा नायक (वय 42) राहणार करीकट्टी, ता. बेळगाव अशी त्यांची नावे आहेत. पोलीस आयुक्त प्रकाश निकम यांनी एका पत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे. या जोडगोळीने हुदली, तुम्मरगुद्दी, मारिहाळ, खणगाव, रंगदोळीसह विविध गावात चोरी केल्याची कबुली दिली आहे.
15 ऑक्टोबर रोजी मारिहाळ पोलीस स्थानकाच्या कार्यक्षेत्रातील हुदली येथे 5 एचपीचे पंपसेट चोरल्यासंबंधी एफआयआर दाखल करण्यात आले होते. या प्रकरणाचा तपास करताना बेळगाव ग्रामीणचे एसीपी एस. एम. नायकर यांच्या मार्गदर्शनाखाली मारिहाळचे पोलीस निरीक्षक आय. आर. पट्टणशेट्टी, उपनिरीक्षक चंद्रशेखर सी., उपनिरीक्षक मंजुनाथ हुलकुंद, बी. बी. कड्डी, आर. एस. बळुंडगी, याकुब महिरा, आर. एच. तळवार, टी. जी. सुळकोड, आर. बी. कुरबर, आर. एस. तळेवाड, आर. एस. पाटील आदींनी या जोडगोळीला अटक करून त्यांच्याजवळून 3 लाख 60 हजार रुपये किमतीचे चोरीचे साहित्य जप्त केले आहे.
