For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

टेलीकॉम कंपनीने केलेल्या रस्ता खुदाईत वाळूने भरलेला डंपर अडकला

05:10 PM Mar 26, 2025 IST | Pooja Marathe
टेलीकॉम कंपनीने केलेल्या रस्ता खुदाईत वाळूने भरलेला डंपर अडकला
Advertisement

हा रस्ता देतोय अपघातांना निमंत्रण, जनतेतून तीव्र संताप

Advertisement

कोल्हापूरः (म्हासुर्ली)

धामणी खोऱ्यातील प्रमुख मार्ग असलेल्या कळे - म्हासुर्ली मार्गावरील म्हासुर्ली बेघर वसाहत (ता. राधानगरी) येथे समोरुन येणाऱ्या वाहनाला बाजू देत असताना टेलीकॉम कंपनीने नेटवर्क केबल करीता खणलेल्या चरात वाळूने भरलेला डंपर अडकला. तर चालकाने प्रसंगावधान राखल्याने मोठा अनर्थ टळला. डंपर अडकल्याने मार्गावरील वाहतूक खोळंबली होती. गेल्या दोन महिन्यापासून सदर मार्गावर मोठ्या प्रमाणात केबलसाठी खुदाई केली आहे. परिणामी रस्ता अपघातास निमंत्रण देत असून सार्वजनिक बांधकाम विभाग व संबंधित कंपनीचे दुर्लक्ष झाल्याने जनतेतून संताप व्यक्त होत आहे.

Advertisement

टेलीकॉम कंपनीची मोबाईल सेवा दर्जेदार मिळण्याकरिता सुमारे दोन महिन्यांपासून नेटवर्क केबल टाकण्याकरिता धामणी खोऱ्यातील प्रमुख मार्गावर मोठ्या प्रमाणात रस्त्यांच्या बाजू पट्ट्यांची खुदाई सुरु केली आहे. सदर केबल टाकण्याकरिता कंपनीने सार्वजनिक बांधकाम विभागाची रीतसर परवानगी घेतली आहे.

मात्र रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या वाहनधारक जनतेच्या सुरक्षेच्या दृष्टीने ज्या उपाय योजना करणे गरजेचे आहे. त्या उपाययोजना करण्याकडे संबंधित मोबाईल कंपनी व सार्वजनिक बांधकाम विभागाने अक्षम्य दुर्लक्ष केले आहे.

बुधवारी सकाळी शिये (ता.करवीर) येथून केएल ०२ एडब्ल्यू ३०४८ क्रमांकचा डंपर वाळू घेऊन म्हासुली येथे येत होता.सदर डंपर गावाजवळील बेघर वसाहत या ठिकाणी आला असता, समोरून येणाऱ्या चार चाकी बोलेरो गाडीला बाजू देत असताना चालकाने डंपरच्या डाव्या बाजूची चाके डांबरी रस्त्यावरून थोडीसी बाजू पट्ट्यावर घेतली. मात्र सदर बाजू पट्ट्या वरती वोडाफोन आयडिया कंपनीने नुकतीच केबलकरिता चर खुदाई केली असून योग्यरित्या चर बुजवला नसल्याने डंपरची चाके खोलवर रुतली गेल्याने डंपर एका बाजूला कलंडल्याने अडकून पडला.

या ठिकाणी रस्ता अरुंद असून डंपरच्या चालकाने प्रसंगावधान राखून डंपर जागच्या जागी थांबवल्याने मोठी दुर्घटना टळली आहे. गेल्या दोन महिन्यापासून धामणी खोऱ्यातील विविध ठिकाणी वोडाफोन आयडिया कंपनीकडून रस्त्याने खुदाई चालू आहे. अनेक वेळा संबंधित कंपनीच्या ठेकेदारांच्या लोकांना स्थानिकांनी प्रत्यक्षात भेटून रस्ता दुरुस्ती योग्य रित्या करण्याबाबत सूचना केली आहे. मात्र संबंधितांकडून उडवा उडवीची उत्तरे दिली जात आहे. रस्ता सुरक्षेच्या दृष्टीने सदर कंपनी व सार्वजनिक बांधकाम विभागाकडून कोणत्याही उपाययोजना केल्या जात नसल्याने जनतेतून संताप व्यक्त होत आहे.

Advertisement
Tags :

.