Kolhapur : कोल्हापुरात टंकलेखन परीक्षेत डमी विद्यार्थी; 11 जणांवर गुन्हा दाखल
मराठी टायपिंग परीक्षेत फसवणुकीचा प्रकार
कोल्हापूर : मराठी टंकलेखन परीक्षेसाठी बोगस विद्यार्थी बसवून फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी परीक्षार्थीसह, टायपिंग संस्थाचालक, आणि परीक्षा केंद्रावरील शिक्षक अशा ११ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबतची फिर्याद शिक्षण विस्तार अधिकारी धनाजी आनंदा पाटील (रा. कळंबा, वाशी रिंगरोड) यांनी दिली.
याबाबत अधिक माहिती अशी की, बापूजी साळुंखे इन्स्टिट्यूट येथे १३ ऑक्टोंबर रोजी मराठी टायपिंग ३० स्पीडची परीक्षा होती. यावेळी शिक्षण विस्तार अधिकारी धनाजी पाटील यांची परीक्षा भरारी पथकामध्ये नियुक्ती करण्यात आली होती. सकाळी ९ वाजता धनाजी पाटील तपासणीसाठी बापूजी साळुंखे इन्स्टिट्यूटमध्ये आले होते. यावेळी त्यांना अक्षय देवकर, धनंजय गोरे, हर्षदा गावडे, आशिष कोकाटे, जनार्दन सुतार या ५ विद्यार्थ्यांच्या जागी अन्य विद्यार्थी परीक्षेस बसल्याचे निदर्शनास आले. त्यांनी परीक्षेसाठी बसलेल्या उमेदवारांकडे आधारकार्ड आणि इतर कागदपत्रांची मागणी केली.
मात्र, संबंधीत उमेदवारांनी कागदपत्रे दाखवण्यास असमर्थता दर्शविली. त्यामुळे हे बोगस विद्यार्थी असल्याचे धनाजी पाटील यांच्या निदर्शनास आले. त्यांनी तत्काळ या विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रातून बाहेर काढले. संबंधीत मूळ परीक्षार्थीसह बोगस विद्यार्थ्यांवर गुन्हा दाखल करण्याबाबत वरिष्ठ कार्यालयासोबत पत्रव्यवहार केला. यास मंजुरी आल्यानंतर शुक्रवारी याबाबत ११ जणांवर शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला.
अक्षय मनोहर देवकर, धनंजय दत्ताराम गोरे, हर्षदा विठ्ठल गावडे, आशिष अमर कोकाटे, जनार्दन मारुती सुतार या पाच विद्यार्थ्यांसह संस्थाचालक दिगंबर विलास पाटील, काशिनाथ शिवाजी शेळके, शिवाजी शंकर राणे, रंजना आनंदराव पोवार, सचिन शिवाजी परीट, संदीप पाटील अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत.
डमी विद्यार्थ्यांचा शोध सुरु
परीक्षेसाठी मराठी टंकलेखनाच्या बसलेल्या डमी विद्यार्थ्यांचा पोलिसांकडून शोध सुरु आहे. टंकलेखनाच्या परीक्षेसाठी बोगस विद्यार्थी बसविण्याची साखळीच कार्यरत असल्याची माहिती समोर येत आहे, याबाबतचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक अभिजीत पवार करत आहेत.