Kolhapur News : स्वामी समर्थ नामजपाने दुमदुमूला पंचगंगा नदी घाट
पंचगंगा घाटावर ५ हजार भक्तांबरोबर श्री स्वामी समर्थ नामस्मरण सोहळा
कोल्हापूर : श्री स्वामी समर्थ हा दीड तास अखंडीत सुरु राहिलेल्या नामजपाने रविवारी सायंकाळी पंचगंगा नदी घाट अक्षरशः दुमदुमून गेला. तिन्ही सांजेच्या वेळी झालेल्यां या नामस्मरण सोहळ्यात तब्बल पाच हजारावर महिला व पुरुष भक्त सहभागी झाले होते. त्यांनी एकसुरात श्री स्वामी समर्थ असे नामस्मरण करीत नदी घाटाला स्वामीमय करुन सोडले.
शनिवार पेठेतील अनंतकोटी ब्रम्हांडनायक स्वामींचा नामस्मरण सोहळा भक्त कमिटीच्या वतीने पंचगंगा नदी घाटावर स्वामी समर्थ नामस्मरण सोहळा आयोजित केला होता. रोजच्या धकाधकीच्या काळात मनशांती लाभावी, मनाचे शुद्धीकरण व्हावे, एवढीच नामस्मरण सोहळा आयोजित करण्यामागची भावना होती. या सोहळ्याच्या प्रारंभी कराडचे नगराध्यक्ष विजयसिंह यादव, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीच्या माजी कोषाध्यक्ष वैशाली क्षीरसागर, स्वामीभक्त मिलिंद धोंड अंबाबाई मंदिरातील सीसीटीव्ही नियंत्रण कक्षाचे राहुल जगताप व संजय घाटगे त्यांच्या हस्ते जय देवी जय देवी जय पंचगंगा ही नदीची आरती केली. त्यानंतर नदी घाटावर उभारलेल्या पाच फणीच्या नागाच्या प्रतिकृतीत विराजमान केलेल्या स्वामी समर्थकांच्या मूर्तीचे सेवकांच्या हस्ते पूजन केले. यानंतर मूर्तीसमोरच पाच हजारावर भक्त भारतीय बैठक मारुन बसले.
यानंतर नामस्मरण सोहळा कमिटीचे प्रमुख अरुण गवळी, गुरुदेव स्वामी, अभिजीत पाटील, बाळासाहेब राऊत यांनी श्री स्वामी समर्थ हा नामजप करायला सुरुवात केली. त्यांच्या सुरात सूर मिसळून भक्तांनीही नामजप करायला सुरुवात केली. जस जसा नामजप व त्याचा स्वर वाढू लागला. तस तसा पंचगंगा नदी घाट दुमदुमन जाऊ लागला. स्वामीमयही होऊ लागला. स्वामी भक्त तर नामजपात स्वतःला हरवून गेले होते. या नामस्मरण सोहळ्याने जणू एखाद्या सत्संगातचे रुप धारण केल्याची अनुभूती आली.
दीड तासांनंतर श्री स्वामी समर्थ या नामजपाची सांगता झाल्यानंतर ओम श्री स्वामी समर्थ हा नामजप अर्धा तास केला. तसेच महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ हा मंत्रही तासभर म्हणण्यात आला. या मंत्राची सांगता झाल्यानंतर नामस्मरण कमिटीकडून सर्वांना प्रसादाचे वाटप केले. नामस्मरण सोहळा यशस्वी करण्यासाठी कमिटीचे अमित पाटील, अथर्व गवळी, सत्यजित सांगावकर, कुणाल स्वामी, अभिजीत सूर्यवंशी व अमोल माने यांच्यासह शंभरावर सदस्य परिश्रम घेत होते.