For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

दमदार पाटीदार

06:00 AM May 29, 2026 IST | Tarun Bharat Portal
दमदार पाटीदार
Advertisement

‘आरसीबी’नं पुन्हा एकदा ‘आयपीएल’च्या अंतिम फेरीत प्रवेश केलाय अन् या भरारीचा विराट कोहली, देवदत्त पडिक्कलच्या जोडीनं फलंदाजीत आणखी एक शिल्पकार राहिलाय तो मध्यप्रदेशचा रजत पाटीदार...कर्णधारपदास साजेसे डाव नोंदविताना त्यानं आपली ताकद पुरेपूर दाखवून दिलीय...

Advertisement

स्थळ : धरमशाला...‘इंडियन प्रीमियर लीग’च्या अंतिम फेरीला धडक देण्यासाठी लढत चालली होती ती बेंगळूरचा रॉयल चॅलेंजर्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात...14 वं षटक अन् ‘आरसीबी’नं नोंद केली ती 4 बाद 140 धावांची...त्यांच्या कर्णधारानं तेव्हा 10 चेंडूत काढल्या होत्या फक्त 14 धावा...‘त्यानं’ डावाची सुरुवात केली ती अतिशय संयमानं नि कुठलीही गडबड न करता...असं वाटायला लागलं की, रॉयल चॅलेंजर्स जास्तीत जास्त मजल मारेल ती 220 धावांपर्यंत. यंदाच्या ‘आयपीएल’चा विचार केल्यास जिंकण्यासाठी 230 धावा देखील अपुऱ्या. शिवाय त्यापूर्वी धरमशालात झालेल्या दोन्ही सामन्यांत विजय मिळविला होता तो दुसऱ्यांदा फलंदाजी केलेल्या संघांनी...

हिमाचल प्रदेशातील त्या स्टेडियमवरील खेळपट्टी, समुद्रसपाटीपासून असलेली उंची, मैदानाचं स्वरुप, भोवतालचं वातावरण यामुळं नेहमी कमी संधी मिळते ती प्रथम फलंदाजी करणाऱ्या चमूला आणि ‘त्याला’ही ते व्यवस्थित माहित होतं...त्यामुळं त्यानंतर 11 व्या चेंडूपासून 23 व्या चेंडूपर्यंत दर्शन घडलं ते अक्षरश: तुफानाचं. ‘त्यानं’ प्रसिद्ध कृष्णाला डोक्यावरून, तर मोहम्मद सिराजला पुढं सरसावत षटकार खेचले नि सुरुवात झाली ती वादळाला...‘त्यानं’ ‘स्वीप’, चेंडू उचलून मारलेले फटके यांचा अगदी मुक्तहस्ते वापर केला. असं वाटलं की, ‘गुजरात टायटन्स’च्या गोलंदाजांना काय चाललंय तेच कळेनासे झालंय. ‘त्यानं’ पाच चौकार हाणले अन् नऊ षटकार लगावले. ‘स्ट्राईक रेट’ 281.82...त्या ‘हल्लाबोल’नं हबकलेल्या गुजरातचा डाव 162 धावांवर कोसळला नि 92 धावांनी दणदणीत विजय नोंदवत बेंगळूरच्या संघानं दिमाखात यंदाच्या ‘इंडियन प्रीमियर लीग’ची अंतिम फेरी गाठली...

Advertisement

‘त्यानं’ जेव्हा मैदान सोडलं तेव्हा साथीदारांनी उभं राहून ‘त्याला’ मानवंदना दिली...‘रॉयल चॅलेंजर्स बेंगळूर’चा कर्णधार रजत पाटीदार...त्याच्या कारकिर्दीची कथा एखाद्या चित्रपटाप्रमाणं. सुरुवातीला नकार, अपमान व आता जयजयकार...त्याला सर्वप्रथम करारबद्ध करण्यात आलं ते 2021 साली ‘आरसीबी’कडूनच आणि किंमत मिळाली 20 लाख रुपये. मध्यप्रदेशच्या त्या खेळाडूनं स्थानिक स्पर्धांत खोऱ्यांनी धावा काढलेल्या असल्या, तरी बेंगळूरच्या संघातर्फे पहिल्या मोसमात खेळणं शक्य झालं ते अवघ्या चार सामन्यांत. त्यात त्याला काढता आल्या केवळ 71 धावा. मग ‘आरसीबी’नं वेळ न गमावता पाटीदारशी लगेच काडीमोड घेतला. विशेष म्हणजे 2022 सालच्या महालिलावात एकाही संघानं त्याच्याकडे ढुंकून देखील पाहिलं नाही...

साल 2022...‘इंडियन प्रीमियर लीग’ अर्ध्यावर येऊन ठेपलेली...आणि अचानक ‘आरसीबी’वर पाळी आली ती नवोदित यष्टीरक्षक लविंथ सिसोदियाला दुखापत झाल्यानं पुन्हा रजत पाटीदारकडे वळण्याची, त्याच्याशी करार करण्याची. परत एकदा देण्यात आले ते 20 लाख रुपयेच...ही संधी मात्र रजतनं गमावली नाही. त्यानं आठ सामन्यांत 333 धावा फटकावल्या नि त्यात समावेश होता तो ‘एलिमिनेटर’मध्ये इडन गार्डन्सवर लखनौ सुपर जायंट्सविरुद्ध 54 चेंडूंत हाणलेल्या 112 धावांचा...‘आयपीएल’च्या प्लेऑफमध्ये भारतातर्फे न खेळलेल्या खेळाडूनं नोंदविलेलं ते पहिलंवहिलं शतक. ‘आरसीबी’नं लढत जिंकली..

परंतु मांडीला झालेल्या दुखापतीमुळं रजत पाटीदारचा संपूर्ण 2023 मोसम पाण्यात गेला. तो परतला 2024 साली आणि 177.13 च्या स्ट्राईक रेटनं त्यानं जमविल्या 395 धावा...2025 च्या लिलावाच्या पूर्वी रॉयल चॅलेंजर्स फक्त तीन खेळाडूंना संघात राखण्याचा निर्णय घेतला. त्यात समावेश होता तो विराट कोहली, यश दयाल व पाटीदारचा...मग अचानक सर्वांना प्रचंड झटका बसला तो महान विराट कोहली असतानाही कर्णधारपदाची माळ रजतच्या गळ्यात घालण्यात आल्यानं. त्याला स्थानिक स्पर्धांत मध्यप्रदेशचं नेतृत्व सांभाळण्याचा अनुभव असल्यानं नवीन जबाबदारी पेलणं फारसं जड गेलं नाही. त्यातच त्यानं 2024-25 च्या सय्यद मुश्ताक अली स्पर्धेत 428 धावांचा पाऊस पाडला तो 186 च्या ‘स्ट्राईक रेट’नं...

2025 सालची इंडियन प्रीमियर लीग...रजत पाटीदारनं ‘आरसीबी’ला 18 वर्षांच्या दुष्काळानंतर जिंकून दिलं ते या स्पर्धेचं पहिलंवहिलं जेतेपद...त्यानं त्या मोसमात 143 च्या ‘स्ट्राईक रेट’नं फटकावल्या 312 धावा. रजतच्या क्षमतेचा विचार केल्यास या धावा कमीच. परंतु संघाला गरज असताना प्रत्येक वेळी तो मदतीला धावून आला. त्याच्या खेळाचं वैशिष्ट्या म्हणजे जेव्हा कठीण परिस्थितीला तोंड देण्याचा प्रसंग येतो तेव्हा तो प्रतिस्पर्ध्यांवर प्रतिहल्ला करण्यास डगमगत नाही. यंदाच्या मोसमात त्याच्या फलंदाजीनं गाठलंय ते नवं शिखर...196 च्या ‘स्ट्राईक रेट’नं 486 धावा...पाटीदार दबावाला व्यवस्थित सामोरा गेलाय अन् काही वेळा तर फलंदाजी केलीय ती अतिशय संयमानं...

रजत पाटीदारचं एरव्ही विश्लेषक वर्णन करायचे ते फिरकी गोलंदाजांचा समाचार घेणारा फलंदाज म्हणून. परंतु त्यानं सिराज, रबाडा, कृष्णा यासारख्यांची धुलाई करून आपण वेगवान गोलंदाजांनाही त्याच पद्धतीनं वागवू शकतो हे दाखवून दिलंय...विश्लेषकांच्या मते, ‘रजतला स्वत:ची ऊर्जा कशी वापरायची हे कळतंय. त्यामुळं संघाला मधल्या फळीत फार मोठा फायदा  झालाय. तो प्रत्येक गोष्ट साध्या-सोप्या पद्धतीनं करतो. त्याचं सारं लक्ष केंद्रीत झालेलं असतं ते त्याला दिलेल्या जबाबदारीवर. कुठलाही कर्णधार जेव्हा यशस्वी ठरतो तेव्हा संघाचा आत्मविश्वास देखील उंचावतो. दरेका लढतीनं त्याचा अनुभव, आत्मविश्व़ास, दबावाला तोंड देण्याची क्षमता वाढविण्याचं काम केलंय’...

रजत पाटीदार हा विराट कोहली, महेंद्रसिंह धोनी, रोहित शर्मा यांच्याप्रमाणं ग्लॅमरच्या वलयात फारसा राहिलेला नाहीये. त्यानं मुलाखती देखील कमीच दिलेल्या आहेत. त्याचा सारा भर असतो तो कामगिरीवर आणि त्याच्या मते तेच शेवटी महत्त्वाचं...33 वर्षांच्या रजतला अजूनही टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांत भारताचं प्रतिनिधीत्व करण्याची संधी मिळालेली नाहीये. मात्र सध्या त्याची कारकीर्द ज्या प्रकारे गती घेत आहे ते पाहता निवड समिती किती काळ त्याच्याकडे दुर्लक्ष करू शकेल?

निवडक कर्णधारांच्या यादीत स्थान...

  • रॉयल चॅलेंजर्स बेंगळूरला सलग दोन इंडियन प्रीमियर लीगच्या अंतिम फेरीत पोहोचविणारा रजत पाटीदार हा पहिला कर्णधार ठरलाय. त्यानं सूत्रं हाती घेण्यापूर्वी ‘आरसीबी’ला 17 हंगामांमध्ये केवळ तीन वेळा अंतिम फेरी गाठता आली होती, त्या तिन्ही वेळा कर्णधार वेगवेगळे होते.
  • ‘आयपीएल’चा विचार करता धोनीनं 2010 ते 2013 या काळात चेन्नई सुपर किंग्सला सलग चार वेळा अंतिम फेरीचं दर्शन घडविलं अन् त्यानंतर 2018 व 2019 मध्ये पुन्हा सलग दोनदा त्या टप्प्यावर पोहोचविलं...तर रोहितच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सनं 2019  नि 2020 मध्ये सलग दोनदा अंतिम फेरीपर्यंत मजल मारली...गुजरात टायटन्सच्या माध्यमातून आपल्या कर्णधारपदाची इनिंग सुरू करणाऱ्या हार्दिक पांड्यानं 2022 आणि 2023 मध्ये संघाला फायनलपर्यंत नेलं...या यादीतील आणखी एक नाव श्रेयस अय्यरचं. त्यानं 2024 च्या अंतिम फेरीत कोलकाता नाईट रायडर्सचं, तर गेल्या वर्षी पंजाब किंग्सचं कर्णधारपद भूषविलं...

वळणदार प्रवास...

  • रजत पटिदार 1 जून रोजी म्हणजे ‘आयपीएल’च्या अंतिम सामन्यानंतर अवघ्या एका दिवसानं 33 वर्षांचा होईल...त्याच्यासमोर महेंद्रसिंह धोनी आणि रोहित शर्मा यांसारख्या दिग्गजांशी बरोबरी करण्याची सुवर्णसंधी चालून आलीय...या दोनच कर्णधारांनी सलग दोन वेळा इंडियन प्रीमियर लीग विजेतेपद आपल्या खात्यात जमा केलंय...
  • याच ‘आरसीबी’नं 2022 मध्ये दुखापतग्रस्त खेळाडूची जागा घेण्याचा प्रस्ताव  ठेवला असता रजत पाटीदारनं तो जवळजवळ नाकारला होता. कारण होतं त्याच सुमारास ठरलेल्या त्याच्या विवाहाचं. मात्र कुटुंबीय आणि जवळच्या मित्रांशी चर्चा केल्यानंतर त्यानं लग्नाची तारीख पुढे ढकलण्याचा कठीण निर्णय घेतला आणि बदली खेळाड म्हणून संघात सामील होण्यासाठी तो तातडीनं रवाना झाला...
  • तो निर्णय पाटीदारच्या कारकिर्दीतील सर्वांत मोठा कलाटणी देणारा क्षण ठरला. आपल्या केवळ दुसऱ्याच सामन्यात गुजरात टायटन्सविऊद्ध 32 चेंडूंमध्ये केलेल्या 52 धावांच्या (ते त्याचं ‘आयपीएल’मधील पहिलं अर्धशतक) जोरावर त्यानं संघातील स्थान पक्कं केलं...त्यानंतर ’एलिमिनेटर’मधील धडाकेबाज शतकी खेळीमुळं तो रॉयल चॅलेंजर्सच्या चाहत्यांचा लाडका खेळाडू बनला. राजस्थान रॉयल्सविऊद्धच्या ‘क्वालिफायर 2’ सामन्यातही हाच फॉर्म कायम राखत तो 42 चेंडूंमध्ये 58 धावांचा आक्रमक डाव खेळला. मात्र त्या सामन्यात त्यांना सात गड्यांनी पराभव पत्करावा लागला...
  • टाचेवरील शस्त्रक्रियेनंतर देशांतर्गत क्रिकेटमधील दमदार कामगिरी आणि ‘इंग्लंड लायन्स’विऊद्ध ‘भारत अ’ संघाकडून झळकावलेलं शतक यांच्या जोरावर रजतला भारतीय कसोटी संघात पहिल्यांदाच स्थान मिळालं होतं. पुन्हा एकदा त्याला बोलावणं आलं ते बदली खेळाडू म्हणूनच...2024 च्या सुऊवातीला वैयक्तिक कारणांमुळं इंग्लंडविऊद्धच्या कसोटी मालिकेतून माघार घेतलेला त्याचा ‘आरसीबी’ संघातील सहकारी विराट कोहली याची जागा त्यानं घेतली...
  • मात्र पाटीदारची पहिल्या कसोटी मालिकेतील वाटचाल अपेक्षेप्रमाणं झाली नाही अन् सहा डावांमध्ये केवळ 63 धावा काढता आल्यामुळं त्याला संघातून डच्चू देण्यात आला...भारतातर्फे त्याला एकच एकदिवसीय सामना खेळता आलाय तो दक्षिण आफ्रिकेविरुद्ध...
  • पाटीदारसाठी 2024 च्या ‘आयपीएल’ हंगामाची सुऊवात संथ पद्धतीनं होऊन चार सामन्यांत त्याच्या खात्यावर केवळ 50 धावा जमा झाल्या होत्या. परंतु त्यानंतरच्या सात डावांमध्ये पाच अर्धशतकं झळकावत त्यानं ‘आरसीबी’च्या फलंदाजी फळीतील एक नवा तारा म्हणून स्वत:ला भक्कमपणे प्रस्थापित केलं...

- राजू प्रभू

Advertisement
Tags :

.