For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

तीन दिवसांच्या सुट्टीमुळे अनेकजण गोव्याबाहेर

03:23 PM Dec 20, 2025 IST | Tarun Bharat Portal
तीन दिवसांच्या सुट्टीमुळे अनेकजण गोव्याबाहेर
Advertisement

मतदानावर परिणाम होण्याची शक्यता : उद्योगक्षेत्रालाही बसणार आर्थिक फटका

Advertisement

पणजी : राज्यात सध्या कडाक्याची थंडी सुरू असून त्या पार्श्वभूमीवर आज शनिवारी सकाळी सुरू होणाऱ्या मतदानाला केवढा प्रतिसाद मिळतो, याकडे सर्वांचे लक्ष आहे. सलग तीन दिवस सार्वजनिक सुट्टी मिळाल्याने अनेक जणांनी गोव्याबाहेर दौरा काढल्याने त्याचा मतदानावर परिणाम होण्याची शक्यता आहे. सलग तीन सुट्ट्या आल्यामुळे त्याचा उद्योग क्षेत्रावरदेखील परिणाम झाला आहे. सत्ताधारी भारतीय जनता पक्षाने ते लढवित असलेल्या एकूण 40 जागांपैकी 35 जागांवर यश मिळेल असा दावा केला आहे.

भाजपची सर्वस्तरीय सज्जता

Advertisement

उत्तर गोव्यात भाजपने जास्त जोर धरला असून सत्ताधारी पक्षातील सर्व आमदारांवर दबाव आणलेला आहे. भाजपने सूक्ष्म पातळीवर फिल्डिंग लावली असून मतदारांना घरातून बाहेर काढून मतदान केंद्रावर आणण्यासाठी यंत्रणा सज्ज ठेवली आहे. याउलट विरोधी पक्षाकडे फारसे कार्यकर्ते नाहीत व बूथ पातळीवर समित्या देखील नाहीत. तथापि काँग्रेस पक्षाशी निगडित असलेले मतदार हे त्या पक्षाबरोबर राहून मतदान करतील.

भाजपमध्ये चलबिचल

मोठ्या प्रमाणात लोक गोव्याबाहेर गेल्याने आज मतदानाला किती मतदार येतील? याबाबत भाजपमध्ये चलबिचल दिसून आली. कोणत्याही परिस्थितीत या निवडणुका जिंकायच्याच असा पण करून बसलेल्या भाजप नेत्यांनी या निवडणुका प्रतिष्ठेच्या बनविल्या आहेत. भाजपच्या कार्यकर्त्यांनी जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला. मात्र प्रचारासाठी आठच दिवस मिळाल्याने अनेक उमेदवार सर्व भागात पोचू शकले नाहीत.

मुख्यमंत्री, दामू नाईक यांचे प्रयत्न

या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने जास्त आक्रमक प्रचार केलेला आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि प्रदेश भाजप अध्यक्ष दामू नाईक या दोघांनी संपूर्ण गोव्यात विविध ठिकाणी सभा घेतल्या, शिवाय कार्यकर्त्यांच्या बैठका घेतल्या. मोठ्या प्रमाणात प्रचार यंत्रणा उभी केली. सभांना बरीच गर्दी जमविली. प्रत्यक्षात आज किती टक्के मतदान होते, ते महत्त्वाचे ठरणार आहे.

  • काल शुक्रवारी गोवा मुक्तिदिनाची सुट्टी होती.
  • आज शनिवारी मतदान असल्यामुळे आज सर्व शाळांना सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे.
  • याशिवाय जे मतदार ग्रामीण भागातील आहेत, त्याही सर्वांना आज सुट्टी आहे.
  • उद्या रविवार असल्याने बहुतांशजणांना सुट्टीच आहे.या सलग तीन दिवसांच्या सुट्टीचा लाभ घेऊन अनेक जणांनी सहलीला जाण्याचे पसंत केले आहे. बरीच मंडळी गोव्याबाहेर टूरवर गेली आहे.
Advertisement
Tags :

.