अचानक आलेल्या पावसामुळे सर्वत्र दाणादाण
शहराच्या मध्यवर्ती भागासह उपनगरांमध्ये साचले पाणी
बेळगाव : अचानक आलेल्या मुसळधार पावसामुळे शहरात दाणादाण उडवून दिली. रविवारी सकाळपासून ढगाळ वातावरण असताना सायंकाळी 6.30 नंतर अचानक दाखल झालेल्या पावसाने व्यापारी वर्गाची दैना झाली. पावसाचा जोर अधिक असल्यामुळे शहराच्या मध्यवर्ती भागासह उपनगरांमध्ये पाणी साचले होते. खडेबाजार परिसरात गुडघाभर पाणी साचल्याने नागरिकांसह व्यापाऱ्यांचीही धावपळ उडाली. दिवाळी अवघ्या काही दिवसांवर आल्याने रविवारी दिवसभर बाजारात खरेदीचा उत्साह दिसून आला. मागील आठ दिवसांपासून परतीच्या पावसाचा धुमाकूळ सुरू आहे. दररोज दुपारनंतर जोरदार पाऊस होत असल्याने खरेदीलाही फटका बसत आहे. त्यामुळे रविवारी तरी दिवसभर उघडीप मिळेल, अशी आशा व्यक्त केली जात होती. परंतु सायंकाळनंतर झालेल्या पावसाने लोकांची तारांबळ उडाली. अचानक आलेल्या जोरदार पावसामुळे खडेबाजार परिसरात पाणी साचले. गटारींमध्ये अडकलेल्या कचऱ्यांमुळे पाण्याचा निचरा होण्यास मार्ग नसल्याने ते पाणी रस्त्यावरून वाहत होते. भाजी विक्रेत्यांची भाजीही या पावसाच्या पाण्याबरोबर वाहून गेली. रस्त्याशेजारी साहित्य विक्रीसाठी ठेवलेल्या विक्रेत्यांना या पावसाचा जोरदार फटका बसला आहे.