पावसामुळे शेतामध्ये पाणीच पाणी
कोल्हापूर :
जिह्यात मान्सूनपूर्व पावसापाठोपाठ मान्सून पावसाचा कहर पाहायला मिळत आहे. त्यामुळे शेतीच्या आंतरमशागतीची कामे खोळंबली आहेत. तसेच या पावसामुळे शेतामध्ये पाणी साचून राहिल्याने, ट्रॅक्टर आणि अन्य शेती मशागतीचे उपकरणे शेतकऱ्यांना वापरता येईना. नांगरणी, खत टाकणे, बांधबंदिस्ती आणि इतर कामे वेळेवर करता आलेले नाही. त्याचा परिणाम खरीप हंगामाच्या पेरणीवर होवून, जिह्यातील शेकडो एकर शेती पेरणीअभावी पडीक पडण्याची शक्यता नाकारता येत नाही.
मान्सूनपूर्व पावसाने संपूर्ण जिह्याला मे महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यापासून झोडपून काढण्यास सुऊवात केली. त्यामुळे शेकडो एकर शेतामध्ये पावसाचे 2 ते 3 फूट पाणी साचून राहिल्याने शेतांना तळ्याचे रुप आले आहे. त्याचबरोबर नद्या, नाले तुडूंब भरुन वाहू लागल्या आहेत. जिह्यात दाणादाण उडवून दिलेल्या पावसामुळे शेतीची आंतरमशागतीची संपूर्ण कामे ठप्प झाली आहेतच. त्यातच शेतामध्ये पावसाचे पाणी साचून चिखल आणि पाण्याची तळी झाल्याने, शेतात कशा पध्दतीने खरीप पिकाची पेरणी कशी करायची याचा मोठा प्रश्न जिह्यातील शेतकऱ्यांच्या पुढे निर्माण झाला आहे.
सतत पडत असलेल्या पावसामुळे जिह्यातील पालक, मेथी, कोबी, वांगी, भेंडी, टोमॅटो, मिरची, गवारी, मुळा, कोथिंबीर यासारख्या भाजीपाल्याच्या शेतामध्ये पाणी साचून राहिल्याने, भाजीपाला पाण्याखाली गेल्याने धोक्यात आली आहेत. काही ठिकाणी भाजीपाला शेतामध्येच कुजू लागल्याने, याचा आर्थिक मोठा फटका शेतकऱ्यांना बसला आहे.
- पेरणीपूर्व तयारी
: खरीप पिकांची चांगली वाढ व्हावी. यासाठी पेरणीपूर्वी शेतीची आंतरमशागतीची कामे करणे आवश्यक असते.
: नांगरणी, वखरणी, खत टाकणे, बांधबदिस्ती करणे यासारखी कामे मे महिन्यात केली जातात.
- पावसामुळे होणारे परिणाम
: सतत पाऊस पडू लागल्याने शेतात चिखल झाला आहे. त्यामुळे ट्रॅक्टर आणि अन्य शेतीची उपकरणे शेतामध्ये चालविता येईना
: शेतामध्ये ओलावा वाढल्यामुळे शेतीला वापसा येईना. तसेच शेतीची मशागतीची कामे खोळंबली
:यावर्षी जिह्यातील शेकडो एकर शेतामध्ये नांगरणीची कामे पूर्ण झालेली नाहीत.
- शेतकऱ्यांना चिंता
: वेळेवर पेरणी झाली नसल्याने त्यांचा परिणाम खरीप पिकावर होणार
: सतत पडत असलेल्या पावसामुळे शेतकरी चिंतेत