मनपाच्या दुर्लक्षामुळे सीटीस 2.0 योजनेचा निधी परत जाण्याचा धोका
राजू टोपण्णावर, सुजित मुळगुंद यांचा आरोप : कन्नड साहित्य भवनमध्ये पत्रकार परिषद
बेळगाव : महापालिकेतील निष्क्रीय कारभारामुळे विकासकामांना खीळ बसत आहे. केंद्र सरकारने राज्यातील सहा स्मार्टसिटीपैकी केवळ बेळगाव शहराची सीटीस 2.0 योजनेंतर्गत निवड करण्यात असून केंद्र सरकारने निधीचीही तरतूद केली आहे. ही बाब आनंदाची असली तरी या योजनेतील निधीचा अद्याप वापर करण्यात आलेला नाही. मार्चअखेर या योजनेतील निधी खर्च न केल्यास तो परत केंद्र सरकारकडे जावून योजना रद्द होण्याच्या मार्गावर आहे. याला सर्वस्वी महापालिका जबाबदार राहणार आहे, असा आरोप राजू टोपण्णवर यांनी केला.
कन्नड साहित्य भवनमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. टोपण्णावर पुढे म्हणाले, सीटीस 2.0 योजना ही केंद्र सरकारची असून शहरी पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा, कचरा व्यवस्थापन, हवामान अनुकूल प्रकल्पांवर भर दिला जातो. या योजनेंतर्गत 135 कोटी रुपयांचे अनुदान दिले जाते. केंद्र 40 टक्के, राज्य 40 टक्के व महापालिकेकडून 20 टक्के निधी दिला जातो. केंद्र सरकारने आपला निधी दिला असून राज्य सरकारही लवकरच निधीची तरतूद करणार आहे. मात्र अद्याप महापालिकेने आपला निधी दिलेला नाही, असा आरोपही त्यांनी केला.
महापालिका सत्ताधाऱ्यांकडून या योजनेकडे कानाडोळा करण्यात येत आहे. यामुळे शहरातील विकासकामे खोळंबली आहेत. तसेच वर्ष झाले तरी या योजनेंतर्गत कामे करण्यात आली नसून केंद्राचा निधी तसाच पडून आहे. मार्चअखेर सदर निधी खर्च न केल्यास निधी केंद्राकडे परत जाणार आहे. यामुळे महापालिका प्रशासनाने लवकरात लवकर या निधीचा विकासकामांसाठी वापर करावा. यासाठी महापालिकेतील सर्वक्षीय आमदारांनी एकत्र येऊन बेळगावचा विकास करावा, असे आवाहनही टोपण्णावर यांनी केले. यावेळी सुजित मुळगुंद उपस्थित होते.