मुसळधार पावसामुळे शेतातील रोप लागवडीच्या मशागत कामांना जोर
वार्ताहर /किणये
तालुक्यात पावसाचा जोर वाढला आहे. गेल्या तीन दिवसापासून मुसळधार पाऊस होत असल्याने नदी, नाले तुंडूब भरून वाहू लागले आहेत. तसेच शेत शिवारामध्ये भरपूर प्रमाणात पाणी साचले आहे. या मुसळधार पावसामुळे रोप लागवडीच्या मशागतीला जोर आला आहे. मच्छे, पिरनवाडी, देसूर, झाड शहापूर, नंदिहळ्ळी, नागेनहट्टी, वाघवडे, संतिबस्तवाड, रणकुंडये, बाळगमट्टी, बामनवाडी, नावगे, किणये, कर्ले, बहाद्दरवाडी, जानेवाडी, कावळेवाडी, बिजगर्णी, बोकनूर, बेळगुंदी, सोनोली, यळेबैल, राकसकोप, बेळवट्टी, इनाम बडस आदी भागात भात रोप लागवड जामाने सुरू आहे.
भात रोप लागवडीसाठी शेतकरी पॉवर टिल्लरच्या सहाय्याने मशागत करत आहेत. तर पॉवर टिल्लर फिरविल्यानंतर बैलजोडीने मशागत करण्यात येत आहे. त्यानंतर रोप लागवड करीत आहेत. पूर्वी बहुतांश प्रमाणात शेतकरी बैलजोडीने मशागत करीत होते. अलीकडे मात्र शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात पॉवर टिल्लर घेतले आहेत. यामुळे या पॉवर ट्रेलरच्या सहाय्याने आडवी उभी मशागत करण्यात येत आहे. त्यानंतर बैलजोडीने मशागत करताना शेतकरी दिसत आहेत. भात रोप लागवड करण्यासाठी मजुरांची टंचाई भासत असल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली. बेळगुंदी, बिजगर्णी परिसरात बहुतांश प्रमाणात भात रोप लागवड करण्यात आलेली आहे. तर मच्छे शिवार परिसरात अजून लागवड शिल्लक आहे. इंद्रायणी, बासुमती, सोनम, शुभांगी, मधुरा व इतर नवनवीन जातीची भात रोप लागवड करण्यात येत आहे.
अतिपाणी झाल्यास व्यत्यय
या रोप लागवडीसाठी सध्या शिवारात बऱ्यापैकी पाणी साचले आहे. मात्र पावसाचा जोर असाच राहिल्यास शिवारात अधिक पाणी होणार आहे. जर शिवारात अधिक पाणी झाल्यास भात रोप लागवड करताना व्यत्यय निर्माण होणार आहे, अशी माहिती शेतकऱ्यांनी दिली. तसेच रोप लागवडीकरिता मशागतीचा हंगाम जोमाने सुरू असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.