Kolhapur News : उन्हामुळे शेतीची कामे पहाटे आणि सायंकाळी!
05:56 PM May 02, 2026 IST | NEETA POTDAR
Advertisement
उष्णतेच्या लाटेचा फटका कृषी अर्थव्यवस्थेला बसत आहे
असळज : सध्या गगनबावडा तालुक्यात उन्हाचा पारा कमालीचा वाढला असून, दुपारच्या वेळी सूर्य आग ओकत आहे. उष्णतेच्या या तीव्र लाटेचा मोठा फटका तालुक्याच्या कृषी अर्थव्यवस्थेला बसत असून, शेतकरी आणि शेतमजूर प्रचंड हैराण झाले आहेत. वाढत्या तापमानामुळे पिकांना वाचवणे आणि शेतातील दैनंदिन कामे पूर्ण करणे हे दुहेरी आव्हान शेतकऱ्यांसमोर उभे राहिले आहे.दुपारच्या वेळी वाढणाऱ्या तापमानामुळे शेतात उघड्यावर काम करणे अशक्य झाले आहे. अशा परिस्थितीत, कडक उन्हापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी गगनबावडा तालुक्यातील शेतकरी आणि शेतमजुरांनी आपल्या कामाच्या वेळा बदलल्या आहेत.
Advertisement
आता सकाळी म्हणजेच पहाटे ५ वाजल्यापासून शेतीची कामे सुरु होत आहेत, तर काही शेतकरी दुपारचे ऊन मावळल्यावर म्हणजेच सायंकाळी शेतात काम करणे पसंत करत आहेत.
दुपारी १२ नंतर शेतात काम करणे जीवघेणे ठरत आहे. वाढत्या उष्णतेमुळे शेतमजूरही दुपारच्या वेळी शेतात काम करण्यास धजावत नाहीत. यामुळे शेतीतील आवश्यक कामे वेळेवर पूर्ण करण्यासाठी शेतकऱ्यांना मोठी कसरत करावी लागत आहे.
सकाळच्या वेळी कामे आटपली तरी दुपारनंतर शेतातील पिकांना पाणी देणे कठीण होत आहे. कडक उन्हामुळे जमिनीत ओलावा टिकून राहत नाही आणि पिके कोमेजून जात आहेत.
Advertisement
सततच्या उन्हामुळे शेतात राबणाऱ्या मजुरांच्या आरोग्यावरही विपरीत परिणाम होत आहे. वाढत्या उष्णतेच्या लाटेमुळे नागरिकांनी आणि विशेषतः शेतकरी वर्गाने उन्हाच्या वेळी योग्य काळजी घ्यावी, भरपूर पाणी प्यावे आणि शक्य असल्यास दुपारच्या वेळी विश्रांती घेणे आवश्यक आहे.