पहिल्या हेड मेकॅनिकमुळे एसटी ठणठणीत
कोल्हापूर / पूजा मराठे :
महिला विविध क्षेत्रात उत्तुंग भरारी घेताना नेहमीच पाहतो. तरीही अशी काही कार्यक्षेत्र आहेत, ज्यामध्ये आजवर पुरुषांचे वर्चस्व राहिले आहे. तरीही अशा विशेष क्षेत्रांमध्ये एखादी महिला उत्तुंग भरारी घेते तेव्हा सर्वच स्थरातून तिचे कौतुक होते. अशी एक विशेष कामगिरी गाजवत स्वत: अस्तित्व सिद्ध करणारी महिला म्हणजे रुपाली संजय भोपळे-पाटील.
रुपाली पाटील या एस टीमध्ये महाराष्ट्रातील पहिल्या हेड मॅकेनिक म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या आगारात येणाऱ्या एसटी बसेसचा रोजचा मेंटेनन्स पाहणे आणि त्यांचे टेस्टींग करून त्या पुन्हा रुटवर पाठविणे हे सर्व काम पाहणाऱ्या त्या महाराष्ट्रातील पहिल्या हेड मॅकेनिक ठरल्या आहेत. एकाचवेळी वर्कशॉपमध्ये तीन-चार बसेस सर्व्हिसिंगसाठी येतात. त्या सर्व बसचे काम मॉनीटर करणे, सर्व हेल्पर स्टाफकडून वेळेत करवून घेणे, असे जबाबदारीचे काम रुपाली पाटील यांना करावे लागते.
रुपाली यांचे वडील महावितरणच्या ‘वेहीकल सेक्शन’ या विभागात नोकरीस होते. वडिलांना काम करताना पाहून त्यांनी मॅकेनिक होण्याचे ठरविले. विशेष म्हणजे त्यांच्या कुटुंबियांनी त्यांना या निर्णयात साथ दिली. त्यानंतर कोल्हापूर आयटीआयमध्ये त्यांनी शिक्षण घेतले. 1999 मध्येही मॅकेनिक विभागात शिक्षण घेतलेली पहिली विद्यार्थीनी म्हणून त्यांचे विशेष कौतुक करण्यात आले. त्यांनी ट्रेनिंगसाठी त्या एमएससीबीच्या वर्कशॉपमध्ये एक वर्ष होत्या. मेकॅनिक या क्षेत्रात शिक्षण आणि ट्रेनिंग पूर्ण झाल्यावर पुढे काय करायचे ? हा प्रश्न त्यांना त्यावेळी पडला होता. कारण या क्षेत्रात महिलांसाठी करिअरच्या संधी उपलब्ध होत नव्हत्या. म्हणून रुपाली यांनी महिलांसाठी दूचाकी चालविण्याचे ट्रेनिंग स्कूल सुरु केले. दरम्यानच्या कालावधीत त्यांना एस टी महामंडळामध्ये मोठी भरती असल्याचे समजले. या भरतीचा अर्ज भरण्यासाठी त्यांच्याकडे 200 रुपये देखील नव्हते. पण त्यांनी जिद्दीने हा अर्ज भरला आणि परीक्षाही दिली. त्यानंतर त्यांनी हेल्पर (सहाय्यक) या पदावर कोल्हापूर एस टी विभागात कामाला सुरुवात केली. दोन वर्ष हेल्पर म्हणून काम केल्यानंतर त्यांच्या सहाय्यक कारागीर ‘क’ या पदी निवड झाली. यापदाचा कार्यभार त्यांनी 11 वर्षे सांभाळला. ‘करिअर’मधील एक एक पायरी चढत त्यांनी आता त्या ‘प्रमुख कारागीर’ या पदावर पोहोचल्या आहेत.
रुपाली यांच्या कार्याबद्दल जाणून घेऊया या विडियोद्वारे
रुपाली यांचे सासर राधानगरी तालुक्यातील एक छोटेसे खेडेगाव आहे. लग्नानंतर सासरचे मॅकेनिक सून म्हणून कसे स्विकातील? हा प्रश्न साहजिकच त्यांच्या मनात होता. पण त्यांच्या सासरच्यांनी या विशेष करिअरचा नुसता स्विकराच नाही केला, तर रुपालीच्या कर्तृत्त्वाचे इतर मुलींना उदाहरणही दिले गेले. त्यामुळे रुपाली यांच्या पंखात आणखीनच बळ आले.
मला या क्षेत्रात काम करण्यासाठी वडील आणि पतीची मोठी साथ लाभली. मी महिला म्हणून विशेष क्षेत्र निवडले तरी माझ्या वडिलांना समाजाला न झुगारता मला साथ दिली. तर लग्नानंतर माझे पदवीचे शिक्षण, ड्रायव्हींग स्कूल, तसेच एस टी मधील नोकरी आणि अंतर्गत परीक्षा अशा अनेक टप्प्यावर माझे पती माझ्या पाठीशी अगदी खंबीरपणे उभे होते. त्यांनी वेळोवेळी त्यांची ड्युटी सांभाळत घराची जबाबदारीही उचलली. त्यामुळे मी या पदापर्यंत पोहोचू शकले.
रूपाली भोपळे- पाटील