महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

वंदे भारतच्या मागणीमुळे इंटरसिटीचा प्रस्ताव बारगळला

11:07 AM Feb 12, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

दुपदरीकरण, विद्युतीकरणाची कामे शिल्लक : वर्षभराचा कालावधी लागण्याची शक्यता

Advertisement

बेळगाव : पुणे-बेळगाव मार्गावर वंदे भारतसाठी रेल्वे बोर्डने परवानगी तर दिली. परंतु, जोवर मिरज-पुणे या मार्गावरील विद्युतीकरणाचे काम पूर्ण होणार नाही, तोवर वंदे भारत सुरू होणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे मागील अनेक दिवसांपासून मागणी होत असलेल्या पुणे-बेळगाव इंटरसिटी एक्स्प्रेसलाही खो बसला आहे. बेळगाव व पुण्याच्या नागरिकांच्या सोयीचे पाहता बेळगाव-पुणे मार्गावर इंटरसिटी सुरू करणेच महत्त्वाचे ठरणार आहे. बेळगावचे माजी खासदार व केंद्रीय रेल्वेराज्यमंत्री कै. सुरेश अंगडी यांनी बेळगाव-पुणे इंटरसिटी एक्स्प्रेस सुरू करण्यासाठी प्रयत्न सुरू केले होते. परंतु, त्यांच्या मृत्यूनंतर ही मागणी प्रलंबित राहिली. मागील तीन ते चार महिन्यांपासून मध्यरेल्वेच्या पुणे विभागाने इंटरसिटी एक्स्प्रेस सुरू करण्यासाठी हालचाली सुरू केल्या होत्या. मिरज-बेळगाव विद्युतीकरण तसेच दुपदरीकरणाचे काम पूर्ण झाल्याने इंटरसिटीचा मार्ग खुला झाला होता. परंतु, राज्यसभा सदस्य इराण्णा कडाडी यांनी बेळगाव-पुणे मार्गावर वंदे भारत सुरू करण्याची मागणी लावून धरल्याने रेल्वे विभागाने इंटरसिटीच्या मागणीला ब्रेक लावला आहे.

Advertisement

इंटरसिटी बेळगावकरांच्या फायद्याची

वंदे भारत एक्स्प्रेस सुरू झाली तरी याचा तिकीट दर अधिक असणार आहे. सर्वसामान्यांना हा तिकीट दर परवडणारा नाही. या तुलनेत प्रवासाचा कालावधी तासाभराने वाढला तरी इंटरसिटी एक्स्प्रेसचा तिकीट दर मात्र वंदे भारताच्या तुलनेत निम्मा असणार आहे. त्यामुळे वंदे भारतपेक्षा इंटरसिटी एक्स्प्रेस बेळगाव-पुणे मार्गावर फायद्याची ठरणार आहे. वंदे भारत एक्स्प्रेसला केवळ सातारा, मिरज व बेळगाव इतकेच थांबे मिळतील. परंतु, इंटरसिटी एक्स्प्रेस सुरू झाल्यास घटप्रभा, कुडची, मिरज, सांगली, सातारा यासह इतर मोठ्या रेल्वेस्थानकांवर थांबेल. याचा विचार करूनच इंटरसिटी एक्स्प्रेस सुरू करण्यासाठी प्रयत्न सुरू ठेवले होते. परंतु, सध्या इंटरसिटी एक्स्प्रेसचा प्रस्ताव बारगळला आहे.

विद्युतीकरणासाठी वर्षभराचा कालावधी

पुणे-मिरज या 279 किलोमीटर रेल्वेमार्गापैकी डिसेंबरअखेरपर्यंत 184 किलोमीटर रेल्वेमार्गाचे दुपदरीकरण झाले होते. अद्याप 94 किलोमीटर रेल्वेमार्गाचे दुपदरीकरण व त्यानंतर विद्युतीकरण होणे बाकी आहे. त्यामुळे पुढील वर्षभर तरी रेल्वेमार्गाच्या दुपदरीकरणाचे काम चालण्याची शक्यता आहे. त्यामुळे वंदे भारतची घोषणा झाली तरी ती प्रत्यक्षात सुरू होण्यासाठी वर्षभराचा कालावधी जाईल.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article