संततधारेनं कोल्हापूरकर मेटाकुटीला
कोल्हापूर :
मागील आठवड्यापासून सतत पडणाऱ्या पावसामुळे कोल्हापूरकर हैराण झाले आहेत. मान्सूनपूर्व कामांचा खोळंबा झाला आहे. खरीपाची पेरणी खोळंबल्याने शेतीचे अतोनात नुकसान झाले आहे. शालेय खरेदी लांबणीवर गेल्याने बालचमूंच्या उत्साहावर पाणी पडले. सुट्टीच्या अखेरीस केलला पर्यटनाचा बेत रद्द झाल्याने अनेकांचा हिरमुड झाला. वाहतुकीच्या कोंडीसह रस्त्यात दलदल आणि चिखलाचे साम्राज्य झाल्याने शहरवासीय मेटाकुटीला आले आहेत. सर्दी-ताप, खोकल्याने डोकं वर काढल्याने आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. पावसाळ्dयापूर्वीच महापूराच्या धास्तीने अनेकांच्या पोटात गोळा आला आहे. एकूणच अवकाळी पावसाने कोल्हापूरकरांच्या चिंतेत भर टाकल्याचे वास्तव आहे.
जिह्यात मागील आठवड्यापासून सुरू असलेल्या मान्सूनपूर्व मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत झाले आहे. गेल्या 24 तासांत जिह्यात सरासरी 45.4 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. गगनबावडा तालुक्यात सर्वाधिक 102.4 मिलिमीटर पाऊस पडला आहे. या सततच्या पावसामुळे पंचगंगा नदीच्या पाणीपातळीत लक्षणीय वाढ झाली आहे. काही ठिकाणी रस्ते जलमय झाले आहेत आणि वाहतूक व्यवस्थेवर परिणाम झाला आहे.
- सोमवारी सकाळपर्यंत असा पडला पाऊस
जिल्हा प्रशासनाच्या अहवालानुसार, गगनबावडा तालुक्यात 102.4 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. भुदरगड (61.9 मि.मी.), कागल (60.6 मि.मी.), आजरा (51.5 मि.मी.), गडहिंग्लज (50.2 मि.मी.) आणि शाहूवाडी (50.0 मि.मी.) येथेही चांगला पाऊस झाला आहे. राधानगरी (48.2 मि.मी.) आणि करवीर (45.8 मि.मी.) तालुक्यांमध्ये सरासरीपेक्षा किंचित जास्त पाऊस नोंदवला गेला, हातकणंगले (33.2 मि.मी.), चंदगड (35.2 मि.मी.), पन्हाळा (33.9 मि.मी.) आणि शिरोळ (26.1 मि.मी.) येथे तुलनेने कमी पाऊस झाला आहे. गेल्या चार दिवसांपासून सलग पडणाऱ्या पावसाने शहरातील रस्ते, गटारी आणि नाले तुंबले असून, अनेक ठिकाणी पाणी साचल्याने नागरिकांची गैरसोय झाली आहे.
- पंचगंगेच्या पाणीपातळीत 24 तासांत दीड फुटांने वाढ
सततच्या पावसामुळे पंचगंगा नदीच्या पाणीपातळीत गेल्या 24 तासांत सुमारे दीड फुटांनी वाढ झाली आहे. कसबा बावडा येथील राजाराम बंधारा पूर्णपणे पाण्याखाली गेल्याने या मार्गावरील वाहतूक बंद केली आहे. पंचगंगेसह इतर नद्यांवरील सुमारे पाच बंधारे पाण्याखाली गेले आहेत. पुढील दोन दिवस मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केल्याने विशेषत: ग्रामीण भागातील दळणवळण यंत्रणेवर परिणाम होण्याची शक्यता आहे.
- शेतीसह ग्रामीण जीवनावर परिणाम
अवकाळी पावसामुळे खरीप हंगामाच्या तयारीत असलेल्या शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. माती ओलसर झाल्याने शेतीची यंत्रे वापरण्यात अडचणी येत असून, पेरणी लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. विशेषत: भात आणि भुईमूग, सोयाबीन आदी उन्हाळी पिकांच्या काढणीवर या पावसाचा विपरीत परिणाम झाला आहे. मशागतीची कामे थांबली आहेत. खरीपाचा पेरा लांबणीवर गेल्याने शेतकरी चिंतेत आहे. ग्रामीण भागात घरांची डागडुजीची कामे खोळंबली आहेत. अनेक ठिकाणी सखल भागात पाणी साचल्याने नुकसान झाले आहे. मे महिन्यात थंडीमुळे दुभत्या जनावरांच्या दूधावरही परिणाम झाला आहे. सरासरी ग्रामीण भागीतील 1 लाख लिटर दूधावर परिणाम झाल्याची प्राथमिक माहिती आहे.
- शहरवासीय हैराण
महापालिकेची नालेसफाई फोल ठरली. प्रमुख 13 नाल्यांतील 22 किलोमीटरपैकी 16 किलोमीटरच्या अंतरात तब्बल 18 हजार टन गाळ काढला. यात प्लास्टीक सुमारे 6 हजार टन होते. रस्त्याच्या कडेला मोठ्या प्रमाणात कचरा आणि खरमाती-गाळ असल्याने पाण्याच निचरा योग्य प्रकारे होत नाही. जलजन्य आजारांसह सर्दी, पडसे, अंगदुखी, ताप आदी आजारांनी डोके वर काढले आहे. विद्यार्थ्यांची शालेय खरेदी रखडली आहे. अनेकांनी 15 जूनला शाळा सुरू होण्यापूर्वी उन्हाळी सुट्टीचा बेत आखला होता. अवकाळी पावसामुळे तो रद्द करावा लागल्याने अनेकांचा हिरमुड झाला. विशेषत: सकाळी आणि संध्याकाळी कार्यालये सुरू होण्याच्या आणि सुटण्याच्या वेळेत शहरातील सर्वच रस्त्यांवर मोठी वाहतुकीची कोंडी होत आहे. अनेक रस्त्यांवर चिखल साचल्याने रस्ते डर्टट्रॅक बनले आहेत. फुलेवाडी नजीक रस्त्याचे काम सुरू असल्याने चिखलामुळे रस्ता निसरडा बनला आहे.
- यंत्रणा अलर्ट मोडवर
हवामान विभागाने 28 मेपर्यंत कोल्हापूरसह कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. गगनबावडा, शाहूवाडी आणि राधानगरीसारख्या तालुक्यांमध्ये अतिवृष्टीची शक्यता असल्याने प्रशासनाने पूर आणि दरड कोसळण्याच्या घटनांवर लक्ष ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. महापालिकेने नाले सफाई मोहीम युद्धपातळीवर राबवली आहे. पाणी साचणाऱ्या भागात धूर आणि औषध फवारणी सुरू केली आहे. प्रशासनाचे सज्जता ठेवली असली तरी नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.