For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

बेंगळूर-पंढरपूर विशेष रेल्वे अल्पप्रतिसादामुळे रद्द

11:41 AM Jul 04, 2024 IST | Tarun Bharat Portal
बेंगळूर पंढरपूर विशेष रेल्वे अल्पप्रतिसादामुळे रद्द
Advertisement

बेळगाव : प्रवाशांचा प्रतिसाद मिळत नसल्याने बेंगळूर-पंढरपूर विशेष रेल्वे रद्द करण्याची नामुष्की नैर्त्रुत्य रेल्वेवर आली आहे. चुकीच्या पद्धतीने एक्स्प्रेसचे नियोजन केल्याने प्रवाशांचा तितकासा प्रतिसाद मिळू शकला नसल्याने बेंगळूर येथून निघणारी दि. 5, 6, 7 तसेच पंढरपूर येथून निघणारी दि. 6, 7 व 8 जुलै रोजीची एक्स्प्रेस रद्द करण्यात येत असल्याचे नैर्त्रुत्य रेल्वेने कळविले आहे.

Advertisement

बेळगाव-हुबळी परिसरातून पंढरपूर येथे होणाऱ्या आषाढीवारी यात्रेमध्ये भाविक सहभागी होतात. त्यामुळे हुबळी-पंढरपूर या मार्गावर रेल्वे सुरू करण्याची मागणी बेळगाव व कारवारच्या खासदारांनी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे निवेदनाद्वारे केली होती. आषाढीवारीपूर्वी 8 दिवस स्पेशल रेल्वे सोडण्याची मागणी होत होती.

परंतु आषाढीवारीच्या 15 ते 20 दिवस आधीच बेंगळूर-पंढरपूर या मार्गावर एक्स्प्रेस सुरू करण्यात आली. अद्याप आषाढीवारीला विलंब असल्यामुळे या रेल्वेफेरीला अत्यंत कमी प्रतिसाद मिळाला. मागील आठ ते दहा दिवसांत बेंगळूर-पंढरपूर एक्स्प्रेसमुळे नैर्त्रुत्य रेल्वेला आर्थिक तोटा बसल्यामुळे पुढील काही दिवस एक्स्प्रेस रद्द करण्यात आली आहे.

Advertisement

आठवडाभर आधीपासून विशेष रेल्वे सुरू करा

पंढरपूर येथे आषाढीवारीनिमित्त बुधवार दि. 17 रोजी मुख्य यात्रा होणार आहे. त्यापूर्वी आठवडाभर आधीपासून हुबळी-पंढरपूर या मार्गावर विशेष रेल्वे सुरू करण्याची मागणी वारकऱ्यांमधून होत आहे. तसेच या मार्गावर स्लीपर व एसी डबे वगळून सामान्य डब्यांची ही एक्स्प्रेस असावी, अशीही मागणी करण्यात येत आहे.

Advertisement
Tags :

.