जोरदार पावसामुळे लेंडी नाला फुटला
शिवारात पाणी शिरून पिकांचे नुकसान
► प्रतिनिधी / बेळगाव
रविवारी झालेल्या दमदार पावसामुळे लेंडी नाला पुन्हा फुटून शिवारात पाणी शिरले आहे. त्यामुळे पिकांचे नुकसान झाले असून शेतकऱ्यांना नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी होत आहे. या नाल्याची दुरुस्ती करावी, यासाठी महानगरपालिका आणि जिल्हा प्रशासनाकडे पाठपुरावा करण्यात आला होता. तरीदेखील त्याकडे दुल झाल्याने पुन्हा यावर्षीही शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे.
लेंडी नाल्याची दुरुस्ती मागीलवर्षी करण्यात आली होती. शेतकऱ्यांनी व महानगरपालिकेने थोडी मदत केली होती. त्यामुळे या नाल्याची बांधणी करण्यात आली होती. लाकडी खांब, तसेच माती टाकून लेंडी नाल्याच्या मोठ्या बांधांची बांधणी करण्यात आली होती. मात्र रविवारी झालेल्या जोरदार पावसामुळे या नाल्याला पाणी अधिक आल्याने बांध फुटला आहे. लेंडी नाल्यातील प्लास्टिक व इतर कचरा शिवारात गेला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.