For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

पुल वाहून गेलेल्या जागी लोकसहभागातून उभारला लाकडी साकव

02:53 PM Aug 20, 2024 IST | अनुजा कुडतरकर
पुल वाहून गेलेल्या जागी लोकसहभागातून उभारला लाकडी साकव
Advertisement

शासनाने दुर्लक्ष केल्याने देवसू - पलीकडचीवाडी ग्रामस्थांचा पुढाकार

Advertisement

ओटवणे । प्रतिनिधी

देवसु पलीकडचीवाडी येथील जीर्ण झालेले पूल यावर्षी अतिवृष्टीत वाहूनच गेले. याकडे सर्वांचे लक्ष वेधूनही दुर्लक्ष करण्यात आले. त्यामुळे सत्ताधाऱ्यांच्या कोट्यावधी रुपयांच्या निधीच्या घोषणा आणि विरोधकांच्या पोकळ आश्वासनावर अवलंबून न राहता देवसु पलीकडचीवाडी ग्रामस्थांनी स्वतःच पुढाकार घेतला. आणि वाहून गेलेल्या पुलाच्या ठिकाणी लोकसहभागातून लाकडी साकव उभारून पलीकडचीवाडीतील शाळकरी मुलांसह ग्रामस्थ व महिलांची होणारी गैरसोय दूर केली. गेल्या अनेक वर्षांपासून हा पुल जीर्ण झाल्यामुळे तो निर्लेखित करून नवीन पूल बांधण्याची ग्रामस्थांची मागणी होती. मात्र याकडे दुर्लक्ष केल्याने अखेर यावर्षी पावसाळ्यात हा पूल वाहून गेला. त्यामुळे गेले महिन्याभर या मार्गावरील रहदारी बंद होती. पलीकडचीवाडीतील ग्रामस्थ याची शासन दखल घेऊन कार्यवाही करेल या आशेवर होते. मात्र त्यांची निराशा झाली. पुल वाहून जाऊन एक महिना उलटूनही कोणतीही कार्यवाही न झाल्यामुळे अखेर पलीकडची वाडीतील ग्रामस्थांनीच यासाठी पुढाकार घेतला. माेडकळीस आलेला पुल सर्वांच्या मदतीने नवीन वासे व कामटा घालुन चांगल्या प्रकारे दुरुस्त करण्यात आला. करायचे ठरवले तर अशक्य काहीच नाही हे पलीकडची वाडीतील ग्रामस्थांनी दाखवून दिले. या कामात चंद्राेजी अर्जुन सावंत, गोविंद आत्माराम सावंत, नवनाथ सिताराम सावंत, संदीप वसंत सावंत, सचिन अशोक सावंत, महादेव सिताराम सावंत, राजेश कृष्णा सावंत, भिवा महादेव सावंत, अर्जुन धोंडी सावंत, धनेश खंडू सावंत, पंढरी नवनाथ सावंत, दुर्वेश संदीप सावंत आदी देवसू पलीकडचीवाडीतील ग्रामस्थांनी सहभाग घेतला.

Advertisement

Advertisement
Tags :

.