ढगाळ वातावरणामुळे देसूरमधील वीट व्यावसायिकांचा खर्च वाढला
पावसाच्या भीतीने ताडपत्री-प्लास्टिक खरेदी जोरात
वार्ताहर/धामणे
देसूर ता. बेळगाव येथील वीट व्यावसायिकांना ढगाळ वातावरणामुळे ताडपत्री खरेदी करण्याचा खर्च वाढला असल्याने वीट व्यावसायिक पुन्हा अडचणीत आले आहेत. गेल्या कांही दिवसापासून देसूर येथे प्रतीवर्षाप्रमाणे वीट व्यवसायाला जोर आला असतानाच अधूनमधून ढगाळ वातावरण निर्माण होत आहे. त्यामुळे वीट व्यावसायिक चिंताग्रस्त झाले आहेत. आता वीट काढण्याच्या कामाला जोर आला आहे. वीट काढणारे मजूर बाहेरील गावाहून मोठ्याप्रमाणात येथे दाखल झालेले आहेत. आणि मोठ्याप्रमाणात कच्च्या विटा काढून ठेवण्यात आल्या आहेत. परंतु आता मोठ्या प्रमाणात ढगाळ वातावरण तयार होत आहे. त्यामुळे अचानक पाऊस पडला तर प्रत्येक वीट व्यावसायिकाचे लाखो रुपयांचे नुकसान होवून तयार करण्यात आलेल्या विटा संपूर्ण बाद होतील म्हणून काही व्यावसायिक वीटभट्टी तातडीने लावून त्या कच्च्या विटा भट्टीद्वारे पक्क्या करण्यासाठी मोठ्या प्रमाणात धावपळ सुरू असल्याचे येथील वीट व्यावसायिकांनी सांगितले. मागील वर्षापेक्षा वीटभट्टीला लागणारे साहित्य लाकूड व कोंडा यांचा दर वाढला असल्याने आणि वीट काढणाऱ्या कामगारांचा पगार यावर्षी दिडपटीने वाढला आहे. त्यामुळे वीट व्यवसाय करणे कठीण जात असल्याचे व्यावसायिकांचे म्हणणे आहे. सध्या पडत असलेले ढगाळ वातावरण पाहून पुन्हा ताडपत्री किंवा मोठे प्लास्टिक खरेदीचा खर्च मोठा येत असल्याचे व्यावसायिकांनी सांगितले.