कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

दुर्दैवी! रुग्णवाहिका वेळेत आली नाही, गर्भवतीने रस्त्यावरच सोडला जीव

10:34 AM May 13, 2025 IST | Snehal Patil
Advertisement

रुग्णवाहिका उपलब्ध होईपर्यंत या महिलेने रस्त्यातच प्राण सोडला

Advertisement

मंडणगड : तालुक्यातील आरोग्य विभागाच्या हलगर्जीपणामुळे तालुक्यातील कुडूक बुदूक येथील गर्भवती महिलेचा मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना शनिवारी घडली. प्रकृती बिघडल्यानंतर या महिलेला मंडणगड ग्रामीण रुग्णालयातून दापोली उपजिल्हा रुग्णालयात नेण्यासाठी शासकीय रुग्णवाहिका उपलब्ध झाली नाही.

Advertisement

यानंतर खासगी रुग्णवाहिका उपलब्ध होईपर्यंत खूप वेळ गेल्याने या महिलेने रस्त्यातच प्राण सोडला. कुडूक-बुद्रुक येथील विधी संदेश सावणेकर (32) असे या महिलेचे नाव असून आरोग्य विभागाच्या भोंगळ कारभाराबाबत तालुक्यातून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत असून घटनेच्या चौकशीची मागणी केली आहे.

विधी संदेश सावणेकर ही सात ते आठ महिन्यांची गरोदर होती. तिला अचानक त्रास होऊ लागल्याने कुटुंबियांनी देव्हारे प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी आणले. या आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी प्राथमिक उपचार करुन पुढील उपचाराकरिता रुग्णवाहिकेद्वारे मंडणगड ग्रामीण रुग्णालयात पाठवले.

ग्रामीण रुग्णालयात या महिलेची प्रकृती बिघडल्याने येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी अधिक उपचारासाठी तिला दापोली येथील उपजिल्हा रुग्णालयात नेण्याचा सल्ला दिला. मात्र दापोली नेण्यासाठी रुग्णालयाची रुग्णवाहिका उपलब्ध झाली नाही. 108 रुग्णाहिकेसाठी फोन केला असता ती रुग्णवाहिका अन्य ठिकाणी गेल्याचे सांगण्यात आले.

त्याचबरोबर 102 रुग्णवाहिका रुग्णालयात असतानाही विविध कारणे सांगून सेवेसाठी उपलब्ध करण्यात आली नाही. नाईलाजाने या महिलेच्या कुटुंबियांनी खासगी रुग्णवाहिकेचा आधार घेऊन दापोली गाठण्याचा निर्णय घेतला. मात्र रुग्णवाहिका शोध कार्यात अधिक वेळ गेल्याने या महिलेचा रस्त्यातच मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले.

या घटनेमुळे मंडणगड- भिंगळोली येथील ग्रामीण रुग्णालय व देव्हारे प्राथमिक आरोग्य केंद्रात गरोदर महिलेवर झालेल्या उपचार पद्धतीबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. रुग्णवाहिका उपलब्ध असूनही ऑक्सिजनची उपलब्धता नसणे, चालक नाही, डिझेल संपले अशी अनेक कारणे रुग्णवाहिकेसंदर्भात आरोग्य विभागाकडून देण्यात आली.

राज्य शासनाच्यावतीने गर्भवती महिलांसाठी विविध योजनांच्या माध्यमातून अत्यावश्यक सेवा उपलब्ध करण्यात आलेल्या असताना मंडणगडात या सेवेची अंमलबजावणी का होत नाही, असा प्रश्न उपस्थित होत आहे. कुटुंबियांकडून मिळालेल्या माहितीनुसार प्राथमिक आरोग्य केंद्र व ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले असता योग्य उपचारासाठी तेथील वैद्यकीय व्यवस्थापन कमी पडल्याचे पुढे येत आहे. या घटनेत दोन जीव गमावल्याने याबाबत तीव्र संताप व्यक्त असून या घटनेच्या चौकशीची मागणी नागरिकांसह कुटुंबियांकडून होत आहे.

संबंधित यंत्रणांकडून माहिती घेतो : गावंडे

या संदर्भामध्ये तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. अभिषेक गावंडे यांच्याशी संपर्क साधला असता या संदर्भात संबंधित यंत्रणांकडून माहिती घेऊन अधिक माहिती देतो असे उत्तर देण्यात आले. त्याचबरोबर सोमवारी या संदर्भातील अधिक माहिती घेण्यासाठी देव्हारे प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी डॉ. हाके यांना संपर्क केला असता त्यांचा दूरध्वनी क्रमांक बंद असल्याचे दिसून आले.

Advertisement
Tags :
#ambulance bus#mandangad#Police action#pregnant women#tarun_bharat_news#tarunbharat_official#tarunbharatSocialMediacrime news
Next Article