दूधसागर पर्यटनाला अखेर प्रारंभ
महिन्याभरात सर्व गोष्टी सुरळीत होतील मुख्यमंत्र्यांचे टूर ऑपरेर्सना आश्वासन
धारबांदोडा : दूधसागर पर्यटनासंबंधी सर्व गोष्टी एका महिन्याच्या कालावधीत सुरळीत करण्याचे आश्वासन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिल्यानंतर काल रविवारपासून दूधसागर पर्यटन हंगामाला सुरळीतपणे सुऊवात झाली. बुकिंग काऊंटर व अन्य काही मुद्द्यांवऊन दूधसागर टूर ऑपरेटर असोसिएशन आणि गोवा पर्यटन विकास महामंडळ यांच्यात संघर्ष निर्माण झाल्याने पर्यटन हंगाम महिनाभर बंद होता. शनिवार दि. 2 रोजी कुळे येथील दूधसागर पर्यटन हंगाम पोलिस बंदोबस्तात सुरु करण्यात आला होता. मात्र दूधसागर टूर ऑपरेटर्स असोसिएशनच्या मागण्या पूर्ण न झाल्याने टूर ऑपरेटर्सनी वाहतूक रोखून धरली होती. मागण्या पूर्ण होईपर्यंत पर्यटकांची वाहतूक सुरु केली जाणार नाही अशी भूमिका घेतल्याने तणावही निर्माण झाला होता.
माजी राज्यसभा खासदार विनय तेंडुलकर यांनी घटनास्थळी भेट देऊन मध्यस्थी केली होती. ऑनलाईन बुकिंग बंद करुन थेट वाहतूक सुरु करण्याचा तोडगा काढला होता. तसेच मुख्यमंत्र्यांसोबत संयुक्त बैठकीचे आयोजन केले होते. आपल्या मागण्या पूर्ण होत नसल्याने असोसिएशनच्या नऊही पदाधिकाऱ्यांनी दि. 2 व 3 नोव्हेंबर असे दोन दिवस साखळी उपोषण करण्याचा निर्णय घेत, उपोषणाला सुरुवातही केली होती. त्यामुळे प्रकरण चिघळण्याची शक्यता होती. ठरल्याप्रमाणे शनिवारी सायंकाळी टूर ऑपरेटर्स असोसिएशनचे अध्यक्ष व इतर पदाधिकाऱ्यांची मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्यासोबत बैठक झाली. या बैठकीला धारबांदोडा पंचायतीचे सरपंच विनायक गावस, विलास देसाई, मच्छिंद्र देसाई हे उपस्थित होते. बैठकीत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सूचविलेल्या तोडग्यावर असोसिएशनच्या शिष्टमंडळाने सहमती दर्शविल्याने काल रविवारपासून ऑनलाईन माध्यमातून बुकिंगद्वारे पर्यटकांची जीपगाड्यातून वाहतूक सुरु करण्यात आली.
गोवा पर्यटन विकास महामंडळाने सुरु केलेला काऊंटर बंद करावा व दूधसागर टूर ऑपरेटर्स असोसिएशनची वेबसाईट त्यांना परत करावी या मागण्या असोसिएशनने लावून धरल्या होत्या. मागणी पूर्ण होईपर्यंत पर्यटन हंगाम सुरु केला जाणार नाही अशी भूमिका असोसिएशनने घेतली होती. मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीत गोवा पर्यटन विकास महामंडळाचा काऊंटर सुरुच राहणार असून महामंडळातर्फे आकारल्या जाणाऱ्या पर्यटन शुल्कात ऊ. 200 कपात करण्यात आली आहे. शिवाय गोवा पर्यटन विकास महामंडळ व दूधसागर टूर ऑपरेटर्स असोसिएशनसोबत ट्रायपार्टी करार केला जाणार असल्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले. एका महिन्यात सर्व गोष्टी सुरळीत केल्या जातील अशी हमी दिल्यानंतर असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी आपले उपोषण मागे घेतले आहे.