Dudhganga Bachani Bridge: 5 वर्षानंतरही बाचणी पूल अपूर्णच, यंदाही वाहतूक बंदच
ज्या गतीने काम पूर्ण करायला हवे होते त्या गतीने त्या पुलाचे काम झाले नाही
चुये : पावसाळा सुरू झाला की दूधगंगा नदीचे पाणी पात्राबाहेर आले की ‘बाचणी बंधारा पाण्याखाली अन् वाहतूक बंद’ असा फलक असा ही प्रतिवर्षाची वाहतुकीची अडचण नित्याची ठरलेली आहे. मात्र ही वाहतूकीची अडचण कायमची दूर व्हावी, महापूर जरी आला तरी या मार्गावरील वाहतूक विना थांबा व्हावी या उद्देशाने वडकशिवाले बाचणी मार्गावर नवीन पूल मंजूर करण्यात आला. मात्र ज्या गतीने काम पूर्ण करायला हवे होते त्या गतीने त्या पुलाचे काम झाले नाही.
संथ गतीने काम त्यामुळे पाच वर्षे ओलांडून सुद्धा हा पूल अद्याप अपूर्ण अवस्थेतच आहे. त्यामुळे जुन्या पुलावरूनच वाहतूक करण्याशिवाय पर्याय उरलेला नाही. यंदाच्या जुना पूल पुराच्या पाण्याखाली गेला आणि वाहतूक ठप्प झाली. त्यामुळे नवा पुल वाहतुकीसाठी कधी खुला होणार याची उत्सुकता नागरिकांना लागलेली आहे.
करवीर तालुका आणि कागल तालुका या दोन तालुक्यांना जोडणारा कोल्हापूर पद्धतीचा बंधारा म्हणजे बाचणी बंधारा होय. बाचणी धरण संस्थेच्या माध्यामातून या बंधाऱ्याची उभारणी करण्यात आली. वडकशिवाले फाट्यावरून जाणारा रस्ता हा बाचणी बंधाऱ्यावरून बाचणी गावात पोहचतो.
तिथून कागल तालुक्यातील आणि राधानगरी तालुक्यातील गावातून हा रस्ता थेट बिद्री कारखान्याला पोहोचतो. त्यामुळे या मार्गावरील प्रत्येक गावातील नागरिकांची वाहतुकीची सोय करणारी व्यवस्था म्हणजे बाचणी बंधाऱ्यावरील मार्ग होय. चुये परिसरातील नागाव, इस्पुर्ली, नंदगाव, वडकशिवाले, कावणे, निगवे खालसा, येवती, म्हाळूंगे व बाचणी परिसरातील खेबवडे, साके, व्हनाळी, केंबळी, बेलवळे बु व बेलवळे खुर्द, सावर्डे चांदेकरवाडी या सर्व गावांचे मध्यवर्ती ठिकाण म्हणजे बाचणी होय.
आठवडा बाजाराचे गाव म्हणजे बाचणीचा उल्लेख होतो. आठवडा बाजारात लाखो रुपयांची उलाढाल होते. त्यामुळे बाचणी बंधारा मार्ग सर्वांनाच सोईचा ठरलेला आहे. या बंध्रायामुळे दोन तालुक्याचा संपर्क बिंदू म्हणूनबाचणी बंधारा (धरण) ओळख झाली आहे.
पहिल्या पावसात बंधारा पाण्याखाली
या बंधाऱ्याची उंची कमी आहे. त्यामुळे मुसळधार पावसाला सुरुवात झाली आणि दुधगंगा नदी पात्राचे पाणी बाहेर पडले की बाचणी धरण पाण्याखाली जाते. वाहतूक ठप्प होते. एवढी मोठी पावसाळ्यातील अडचण कित्येक वर्षापासून नागरिकांना सोसावी लागत आहे. बंधाऱ्यालगत उंच फुल बांधावा व वाहतुकीची अडचण कायमची दूर व्हावी ही मागणी कित्येक वर्षाची होती.
त्याप्रमाणे राज्य शासनाच्या जलसंपदा विभागाने याचा गांभीर्याने विचार करून नवीन पुलाला मंजुरी दिली. मोठ्या थाटामाटात या नवीन पुलाच्या कामाचा शुभारंभ झाला. अवघ्या तीन ते चार वर्षात हा पूल पूर्ण होऊन वाहतुकीसाठी खुला होईल अशी चर्चा शुभारंभ प्रसंगी अनेकांनी व्यक्त केली होती.
गेली पाच वर्ष या पुलाचे काम सुरू आहे. संथ गतीने काम सुरू राहिल्याने पाच वर्षे ओलांडली तरीसुद्धा हा पूल अपूर्णच अशी अवस्था सध्या पाहायला मिळत आहे. गेल्या पावसाळ्यामध्ये जुना पूल पाण्याखाली आणि नवा पूल सुद्धा पाण्याखाली अशी दयनीय अवस्था नागरिकांना पाहायला मिळाली होती. ज्या हेतून पुलाची उंची केली ती सुद्धा चुकीची ठरली. दोन्ही पूल पाण्याखाली गेले. यावरूनच या पुलाचे केलेले नियोजन योग्य कि अयोग्य हे अधोरेखित होते.
पुढील वर्षी पुलावरून वाहतूक खुली होईल का ?
पुलाच्या बांधकामाची रेंगाळलेली गती पाहता पुढील वर्षी तरी हा पूल वाहतुकीसाठी सोयीचा ठरेल की काय अशी शंका अनेकांच्या मनात वारंवार येत असते.
भरावा काम अपूर्ण
पुलाचे काम अंतिम टप्प्यात आहे बाचणी बाजूकडील व वडकशिवाले बाजू कडील पुलाला जोडणारा भरावा हे काम सध्या नियोजित आहे. त्या दृष्टीने या मार्गावरील दुरुस्तीचे काम सध्या सुरू आहे. भरावा पूर्ण झाला तर पूल पूर्ण होणार आहे. त्यामुळे जलसंपदा विभागाने नागरिकांच्या अडचणांचा विचार करून या पुलाचे काम जलद गतीने पूर्ण करून पूल वाहतुकीस खुला करावा, अशी मागणी जनतेतून होत आहे.
जुना पूल धोकादायक!
वडकशिवाले - बाचणी बंधारा फार जुना आहे. सध्या त्याची साईटच्या पिलरची डागडुजी केलेली आहे. दुरुस्तीची मलमपट्टी फक्त आहे हा धोकादायक अवस्थेत आहे. सध्या नागरिक धोकादायक अवस्थेतून वाहतूक करीत आहेत. मूळ पिलर फार जुने आहेत. त्यामुळे तत्काळ नवीन पुलाचे काम होणे आवश्यक आहे.
लोकप्रतिनिधींनी लक्ष देण्याची गरज
नवीन पुलाचे काम तत्काळ पूर्ण करून या पुलावरून वाहतूक करण्यासाठी लोकप्रतिनिधींनी संबंधित खात्याकडे पाठपुरावा करणे गरजेचे आहे. लोकप्रतिनिधींनी विशेष लक्ष देऊन फुल पूर्णत्वाला न्यावा आणि वाहतुकीची व्हावी, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.