अंधारी प्रकरणात नामचिन गुंड दुबुले जेरबंद
कास, कुडाळ :
अंधारी (कास, ता. जावली) येथील संजय शेलार खून प्रकरणाचा ट्टिवस्ट आणखी वाढत आहे. या प्रकरणावर जितका दबाव पडेल तितकेच हे प्रकरण तरुण भारत उसळी घेवून जनतेपुढे आणणार आहे. कायद्यातील तांत्रिक गोष्टींचा आधार घेवून ‘थोरला आका’ बाहेर पडला असला तरी गुरूवारी प्रत्यक्ष खून करणाऱ्या नामचिन गुंडाला धाराशिवमध्ये अटक करण्यात आली आहे. अंधारीच्या संजय शेलार खून प्रकरणाचा सडेतोड जबाब घेणाऱ्या तरुण भारतवर जिल्हाभरातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. दरम्यान, ‘आज न कल होगी कयामत की रात’ असे मानून तरुण भारतचे वार्तांकन सुरू आहे. अंधारी खून प्रकरणामध्ये प्रचंड गूढ लपले असतानाही साऱ्या यंत्रणा चिडीचूप होत्या. संजय शेलारचा खून झाल्यानंतर तब्बल 14 दिवसांनी पहिला आरोपी जेरबंद झाला. आणि त्याला तात्काळ सोडण्यात आले. खून प्रकरणातील आरोपीला अशा प्रकारे सोडण्यात आल्यामुळे महाराष्ट्रातील न्याय व्यवस्था, पोलीस दल आणि पत्रकारिता या साऱ्यांमध्येच आश्चर्य व्यक्त करण्यात आले.
- मोठा आका सुटला तरी छोटा आका जेरबंद
संजय शेलार खून प्रकरणी अंधारी आणि परिसरातील 20 गावच्या ग्रामस्थांच्या चर्चेनुसार मोठ्या आकाला म्हणजेच जलसागर-पिकॉक हॉटेलचा मालक अरुण कापसे याला अटक केल्याने समाधान व्यक्त होत होते. मात्र गुरुवारी सकाळी त्याची सुटका झाल्याचे कळताच त्यांच्यात संताप आला. अनेकांच्या मते अरुण कापसे मोठा आका आहे. पण प्रत्यक्ष खून करणारा आका कोण? याबाबत साऱ्याच्यात उत्सुकता होती.
- छोटा आकास्द्धा आला अटकेत
संजय शेलार खून प्रकरणातील आरोपी अरुण कापसे हा कोट्याधीश असून मृत संजय शेलार याची बायको त्याच्याकडे नोकरीला होती. या साऱ्या प्रकरणात प्रत्यक्ष कृती करणारा अन्य कोणी असणार हे निश्चित होते. ‘तरुण भारत’ने प्रसिद्ध केल्याप्रमाणे या छोट्या आकाला धाराशिवमध्ये जेरबंद केल्यानंतर गुरूवारी त्याला सातारा एलसीबीने अटक केली.
- नामचिन गुंड रामचंद्र दुबुले
अंधारीच्या संजय शेलार खून प्रकरणात सातारा पोलिसांचा तपास सुरू होता. अनेक फोन कॉल आणि सीडीआर तपासल्यानंतर हा तपास एका नामचिन गुंडाच्या दिशेने निश्चित करण्यात आला. आणि हाच कयास कारणी लागला. सातारा एलसीबीने इनचार्ज अरुण देवकर यांच्या सूचनेनुसार विश्वास शिंगाडे यांनी रामचंद्र दुबुले याला धाराशिवमध्ये जेरबंद केले.
रामचंद्र दुबुले हा मूळचा उस्मानाबाद-धाराशिव येथील रहिवाशी असला तरी त्याने सातारा शहरात एक वलय निर्माण केले होते. तीन वर्षापूर्वी सातारा तालुका पोलीस ठाण्यासमोर झालेल्या खून प्रकरणात हा मुख्य आरोपी होता. मूळचा धाराशिवचा असला तरी सध्या हा रामचंद्र दुबुले शाहूपुरीत रहायला आहे. दरम्यान, रामचंद्र दुबुले आणि तांत्रिक आधार घेवून गुन्ह्यातून पसार झालेला अरुण कापसे यांचा संवाद, संपर्क, सहवास शोधणे हे पोलिसांपुढे आव्हान आहे.
- रिक्षा की टुव्हिलर
खून होण्याआधी संजय शेलार हा वाईमधून एका व्यक्तीसोबत निघालेल्याचे वृत्त सर्वत्र पसरले. मात्र साताऱ्यातून कासमार्गे अंधारीकडे जाताना या रिक्षाचा कोणताही मागमूस नव्हता. त्यामुळे आरोपी रामचंद्र दुबुले आणि मृत संजय शेलार हे दुचाकीवरून अंधारीच्या दिशेने गेल्याचा संशय आहे.
- दारू की ताडी
संजय शेलार यांच्या पत्नीने दिलेल्या फिर्यादीत अरुण कापसे हा अनेकदा दारू पितो या नावाखाली संजयला मारहाण करत होता. मात्र घटनेच्या आधी रामचंद्र दुबुले आणि संजय शेलार यांनी दारू आणि ताडी विकत घेतल्याचे बोलले जात आहे.
- आज ना कल होगी कयामत की रात
संजय शेलार खून प्रकरणी तरुण भारतने घेतलेली कणखर भूमिका यावर अनेकांनी अभिनंदन केले. आपण असाच पाठपुरावा करावा असे एका वयस्कर व्यक्तीने म्हणताच तरुण भारतने आम्ही कायमच न्यायाची भूमिका घेता हे स्पष्ट केले. त्यावर ‘आज ना कल होगी कयामत की रात’ हे उद्गार वाचून सारेच भावूक झाले.