राणाच्या चौकशीत ‘दुबई मॅन’चे नाव
हल्ल्यावेळी तहव्वूर होता 26/11 चा मास्टरमाइंड साजिदच्या संपर्कात
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) शनिवारी 2008 च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यातील आरोपी तहव्वूर राणा याची सलग चौकशी सुरू केली आहे. चौकशीदरम्यान राणाने ‘दुबई मॅन’चे नाव घेतले आहे. ह्या ‘दुबई मॅन’ला हल्ल्याची संपूर्ण योजना माहित होती. ही व्यक्ती पाकिस्तान आणि दुबईमधील नेटवर्क हाताळत होती आणि हल्ल्यांसाठी वित्तपुरवठा व लॉजिस्टिकल समर्थनात महत्त्वाची भूमिका बजावत होती, असा संशय तपास यंत्रणेला आहे. मात्र, ‘दुबई मॅन’ म्हणजे नक्की कोण यासंबंधी उलगडा झालेला नाही.
तहव्वूर राणाने एनआयए चौकशीदरम्यान 26/11 हल्ल्याचा मास्टरमाइंड मानला जाणारा जागतिक दहशतवादी साजिद मीर याच्या सतत संपर्कात असल्याची कबुली दिल्याचे समजते. राणाचा पाकिस्तानच्या गुप्तचर संस्थेशी जवळचा संबंध होता. तसेच त्याला पाकिस्तानी लष्कराच्या गणवेशाची विशेष आवड होती, असेही समोर आले आहे.
दिल्लीच्या पटियाला हाऊस कोर्टाने राणाला 18 दिवसांची एनआयए कोठडी सुनावली आहे. कोठडीदरम्यान, एनआयए अधिकारी दररोज राणाच्या चौकशीची डायरी तयार करणार आहेत. चौकशीच्या पहिल्या दिवशी (शुक्रवारी) एनआयएने त्याची 3 तास चौकशी केली. सुरुवातीला तो तपास अधिकाऱ्यांना सहकार्य करत नव्हता. त्याने बऱ्याच प्रश्नांची उत्तरे ‘माहीत नाही, आठवत नाही’ अशा स्वरुपात दिल्यामुळे तपास अधिकारीही संभ्रमात होते. मात्र, आता चौकशी करणाऱ्या अधिकाऱ्यांना राणाकडून योग्य प्रतिसाद मिळत असल्याचे समजते. सध्या एनआयए तहव्वूरच्या कुटुंब आणि मित्रांबद्दल माहिती गोळा करण्याचा प्रयत्न करत आहे.