दुबई हे आमचे घरगुती ठिकाण नव्हे : रोहित
टीका करणाऱ्या माजी खेळाडूंचा मुद्दा काढला खोडून
प्रतिनिधी/ दुबई
चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारत आपले सर्व सामने दुबईत खेळल्यामुळे त्यांना फायदा झाला आहे ही धारणा कर्णधार रोहित शर्माने खोडून काढला आहे. हे आमचे काही घरगुती ठिकाण नाही आणि येथील खेळपट्ट्यांमुळे संघाला वेगवेगळ्या आव्हानांना तोंड द्यावे लागलेले आहे, असे त्याने सागितले.
पाकिस्तान, ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडमधील अनेक माजी खेळाडूंनी भारताने संपूर्ण सामने दुबईमध्ये खेळण्यास आक्षेप घेतलेला आहे. या निर्णयामुळे त्यांना गट ‘अ’मधील इतर संघांपेक्षा परिस्थितीशी जुळवून घेण्याची जास्त चांगली संधी मिळाली असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले आहे. ‘प्रत्येक वेळी खेळपट्टी वेगवेगळी आव्हाने ठेवत आली आहे. आम्ही येथे खेळलेल्या तिन्ही सामन्यांमध्ये खेळपट्टी वेगवेगळ्या प्रकारे वागली आहे. हे आमचे घरगुती स्थळ नाही, हे दुबई आहे. आम्ही येथे फारसे सामने खेळलेलो नाही आणि ही खेळपट्टी आमच्यासाठीही नवीनच आहे’, असे रोहितने ऑस्ट्रेलियाविऊद्धच्या उपांत्य सामन्यापूर्वी झालेल्या पत्रकार परिषदेत सांगितले.