रेल्वेस्थानकावर मद्यपी अन् भिक्षुकांचा वावर
स्मार्ट रेल्वेस्थानकावरील अनागोंदीला जबाबदार कोण?
बेळगाव : बेळगाव रेल्वेस्थानक स्मार्ट झाले परंतु येथील यंत्रणा मात्र स्मार्ट होताना दिसत नाहीत. रेल्वेस्थानकात मद्यपी तसेच भिक्षुकांचा प्रवाशांना होणारा मन:स्ताप, प्रतीक्षागृह असतानाही जागा मिळेल तेथे झोपलेले प्रवासी व भिक्षुक, प्रवाशांच्या साहित्याची तपासणी न करताच रेल्वेस्थानकात प्रवेश दिला जात असल्याने नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. भारत-पाकिस्तानमधील ताणलेल्या संबंधांनंतर देशातील रेल्वेस्थानकांचा सतर्कतेचा इशारा देण्यात आला. इतर रेल्वेस्थानकांमध्ये प्रवाशांच्या साहित्याची तपासणीही केली जाते. परंतु, बेळगावमध्ये अशी कोणतीच यंत्रणा नसल्याचे दिसून आले आहे.
यापूर्वीही एका सामाजिक कार्यकर्त्याने एक भली मोठी बॅग घेऊन कोणी जाब विचारतात का? यासाठी व्हिडिओ केला होता. परंतु, कोणीच त्याची चौकशी केली नसल्याने सुरक्षा यंत्रणांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले होते. सकाळच्यावेळी बेळगावहून पुण्याला वंदे भारतने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना वाटेत झोपलेल्या भिक्षुकांमुळे गैरसोय होत आहे. तिकीट असेल तरच रेल्वेस्थानकात झोपण्याची परवानगी असतानाही बाहेरचे प्रवासी रेल्वेस्थानकात येतातच कसे? की सुरक्षा यंत्रणाची भीती नागरिकांमध्ये राहिलेली नाही, असा प्रश्न उपस्थित होत आहे. प्लॅटफॉर्म तिकीट न काढता रेल्वेस्थानकात गेलेल्या प्रवाशांवर दंडात्मक कारवाई करणाऱ्या रेल्वे अधिकाऱ्यांकडून भिक्षुक तसेच मद्यपींवर कोणतीही कारवाई होताना दिसत नाही.
खासदारांच्या दौऱ्यावेळीही मद्यपींचा वावर
चार दिवसांपूर्वी खासदार जगदीश शेट्टर यांनी बेळगाव रेल्वेस्थानकाचा आढावा घेण्यासाठी भेट दिली. यावेळी काही मद्यपी रेल्वेस्थानकाच्या आतील बाजूला प्रवाशांसाठी राखीव असलेल्या जागेवर झोपलेले दिसून आले. खासदार आल्याचे दिसताच पोलिसांनी त्या मद्यपींना तेथून हटवले. परंतु, दररोज प्रवाशांना मद्यपी व भिक्षुकांचा मन:स्ताप सहन करावा लागत आहे. विशेषत: महिला प्रवाशांना त्यांचा सर्वाधिक त्रास सहन करावा लागत असून स्मार्ट रेल्वेस्थानक खरोखरच स्मार्ट कधी होणार? असा प्रश्न केला जात आहे.