मद्यपी मुलाने केला आईचाच खून
दहिवडी :
आईने हाताने जेवण न दिल्याच्या कारणावरून डोक्यात स्टीलच्या हांड्याने प्रहार करून गंभीर जखमी केल्यामुळे मृत्यू झाला. गुन्हा करून लपून बसलेल्या आरोपी मुलगा विशाल आनंदराव जाधव (वय 32, रा. पिंगळी बुद्रुक) यास सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे आणि सहकाऱ्यांनी तात्काळ ताब्यात घेतले.
याबाबत हकीकत अशी की, दहिवडी पोलीस स्टेशन हद्दीतील पिंगळी बुद्रुक गावात रात्री संगीता आनंदराव जाधव (वय 52 वर्ष रा. पिंगळी बुद्रुक) या घरात झोपलेल्या असताना त्यांचा मुलगा विशाल आनंदराव जाधव (वय 32 वर्षे) हा दारू पिऊन घरी आला व आईला जेवायला दे असे म्हणाला. परंतु खूप उशीर झाल्याने व मुलगा दारू पिऊन आल्याचा राग आल्याने आईने मुलास सांगितले की तू तुझ्या हाताने जेवण घे. त्यामुळे विशाल जाधव याने दारूच्या नशेत आईला शिवीगाळ व मारहाण करण्यास सुरूवात केली. सदरचा वाद इतक्या टोकास गेला की आरोपीने घरात असलेल्या स्टीलच्या हंड्याने आईच्या डोक्यात जोरात मारण्यास सुरुवात केली. या मारहाणीत आई संगीता जाधव गंभीर जखमी झाल्याने त्यांना वैद्यकीय उपचाराकरिता दहिवडी तसेच सातारा येथे नेण्यात आले, परंतु यामध्ये संगीता जाधव यांचा मृत्यू झाला. या कृत्यानंतर संशयित आरोपी विशाल आनंदराव जाधव हा लपून बसला होता. त्यास सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे, पोलीस उपनिरीक्षक यशवंत जामदार, महिला पोलीस हवालदार विजयालक्ष्मी दडस, पोलीस हवालदार रामचंद्र गाढवे, पोलीस हवालदार संभाजी खाडे यांनी शोधून काढले आणि ताब्यात घेतले.
सदरची कामगिरी ही सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक समीर शेख, अप्पर पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर, उपविभागीय पोलीस अधिकारी अश्विनी शेंडगे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलेली आहे.