For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

मद्यपीची कमाल...नागरिक बेहाल

11:07 AM May 25, 2024 IST | Tarun Bharat Portal
मद्यपीची कमाल   नागरिक बेहाल
Advertisement

टिळक चौक परिसरातील वीजपुरवठा तब्बल अर्धा तास बंद

Advertisement

बेळगाव : शहरातील भरवस्तीचा परिसर... स्थळ टिळक चौक, वेळ सायंकाळी 5 ची... मद्यपीची कमाल... चक्क विद्युत खांबांवर चढाई, परिणामी बघ्यांची तोबा गर्दी... हेस्कॉम कर्मचाऱ्यांची तत्परता... आणि अखेर सुटकेचा नि:श्वास. शहरातील टिळक चौक येथे एका मद्यपीच्या करामतीमुळे हेस्कॉमच्या लाईनमनचे नाकीनऊ आले. यामुळे तब्बल अर्धा तास परिसरातील वीजपुरवठा बंद करावा लागला. मद्यपीमुळे लाईनमनच्या सहनशीलतेचा अंत पाहिला गेला. याबाबतचे सविस्तर वृत्त पुढीलप्रमाणे- शुक्रवारी सायंकाळी 5.15 च्या सुमारास टिळक चौक येथील वीज नियंत्रण करणाऱ्या जेओएस विद्युत खांबांवर एक मद्यपी चढला. उच्च विद्युतभारीत वाहिन्या जेओएसवर होत्या. काही नागरिक त्या मद्यपीला खाली उतरण्यासाठी मनधरणी करीत होते. परंतु, तो काही केल्या खाली उतरण्यास तयार नव्हता. त्यावेळी त्या परिसरातून जाणाऱ्या लाईनमनने हा घडलेला प्रकार पाहिला. त्याने ताबडतोब वरिष्ठ अधिकाऱ्यांना फोन करून परिसरातील वीजपुरवठा बंद करण्याचे आवाहन केले. वीजपुरवठा बंद करण्यात आला खरा. परंतु, तो मद्यपी खाली उतरण्यास काही तयार नव्हता. नागरिक तसेच लाईनमनने विनंती करूनही तो तेथेच उभा होता. घटनास्थळी पोलीसही दाखल झाले. परंतु, तो पोलिसांचेही ऐकून घेत नव्हता. अखेर अर्ध्या तासाच्या परिश्रमानंतर लाईनमनने शिताफीने मद्यपीला खाली उतरविले. ही घटना पाहण्यासाठी नागरिकांची तोबा गर्दी झाली होती. अनेकांनी घडलेला प्रकार मोबाईलमध्ये कैद करण्यासाठी गर्दी केली होती. वीजपुरवठा सुरू असताना जर मद्यपीने उच्च विद्युतभारीत वाहिन्यांना स्पर्श केला असता तर मोठा अनर्थ घडला असता. परंतु, परिसरातील नागरिक तसेच हेस्कॉम कर्मचाऱ्यांनी तत्परता दाखविल्याने मद्यपीचा जीव वाचला. घडलेल्या प्रकारामुळे टिळक चौक, रामलिंगखिंड गल्ली परिसरातील नागरिकांना अर्धा तास विजेविना रहावे लागले.

Advertisement
Advertisement
Tags :

.