Miraj Crime | मिरजेत भरदुपारी काळजाचा ठोका चुकवणारा थरार; दोन गाड्या उडवून पालिकेचा कारंजा फोडला, पुढे काय घडलं?
मिरज : शहरातील ईदगाहनगरयेथे शंभर फुटी रस्त्यावर मद्यपी चारचाकी चालकाने शनिवारी दुपारी थरार केला. रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करत बेदरकारपणे वाहन चालवून दोन वाहनांना उडविले. तसेच शंभरफुटी रस्त्यावर महापालिकेने विकसित केलेल्या शोभेच्या कारंजालाही धडक दिली. यामुळे वाहनांसह महापालिकेच्या कारंजाचे मोठे नुकसान झाले.
स्थानिक नागरिकांनी मद्यधुंद चालकाचा पाठलाग करुन त्याला पकडले. चोप देऊन गांधी चौकी पोलिसांच्या हवाली केले. गांधी चौकी पोलिसांनी संशयीत मद्यपी चालक शुभम राजेंद्र गायकवाड (रा. गव्हर्मेंट कॉलनी, कुंभारमळा विश्रामबाग) याला ताब्यात घेतले. त्याचीही चारचाकीही जप्त केली. रात्री उशिरापर्यंत घटनास्थळाचा पंचनामा करुन गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. घटनास्थळावरुन मिळालेली माहिती अशी, संशयीत शुभम गायकवाड मद्यधुंद अवस्थेत सुमो चारचाकी (एमएच-०६-डब्ल्यु-३३११) मधून इदगाहनगर जवळ असलेल्या शंभरफुटीवरुन कुपवाडकडे जात होता. मोठा वप्रशस्त असल्या कारणाने संशयीत मद्यपी चालकाने बाहनाचा वेग वाढविला.
त्यामुळे त्याचे वाहनावरील नियंत्रण सुटले. त्याने समोरुन जाणाऱ्या सुरेश लक्ष्मण नांद्रेकर (रा. आशिर्वाद कॉलनी) यांच्या अल्टो कार (एमए-१०-डीजी-७४७०) एका दुचाकीस्वाराला उडविले. सदर रस्त्यावरच शोभेच्या कारंजालाही धडक दिली.मद्यपी चालकाने भर दुपारी हा थरार केल्याने नागरिकांमध्ये घबराट पसरली.
वाहनांना उडवून आणि कारंजा पाडूनही मद्यपी चालक तशाच वेगात थरारक करत पुढे जात होता. काही तरुणांनी दुचाकीवरुन पाठलाग करुन मद्यपी चारचाकी चालकाला पकडून चोप दिला. त्यानंतर महात्मा गांधी चौकी पोलिसांच्या स्वाधिन केले. पोलिसांनी अपघातग्रस्त चारचाकी जप्त केली. संशयीत चालक शुभम गायकवाड याला ताब्यात घेऊन गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.