म्हापसा, साळगाव कारवाईत 6.80 लाखाचा ड्रग्ज जप्त
दोन संशयितांना अटक, साळगाव पोलिस व सीआयडीने केली कारवाई
प्रतिनिधी/ पणजी
गुन्हा अन्वेषण विभागाच्या पोलिसांनी (सीआयडी) मरड-म्हापसा व धनवाडा साळगाव अशा दोन ठिकाणी केलेल्या कारवाईत तब्बल 6.80 लाखाचा ड्रग्ज जप्त केला आहे. या प्रकरणात दोन संशयितांना अटक केली आहे. संशयितांच्या विरोधात एनडीपीएस कायद्यांतर्गत गुन्हा नोंद केला असून त्यांना पोलिस कोठडीत ठेवण्यात आले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अटक केलेल्या संशयितांमध्ये श्याम चव्हाण (22, डोंगरी-वास्को) व दिनेश ऊपचंद कुमार (30 हिमाचल प्रदेश) यांचा सहभाग आहे. सीआयडी पोलिसांनी मरड-म्हापसा येथे छापा टाकून श्याम चव्हाण याला अटक केली आहे. त्याच्याकडून 4 लाख ऊपये किमतीचा 4 किलो गांजा जप्त करण्यात आला. मरड-म्हापसा येथील खुल्या पार्किंग परिसरात एक युवक गांजा तस्करीसाठी येणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांना मिळाली होती.
त्यानुसार, पोलिस अधीक्षक राहुल गुप्ता आणि उपअधीक्षक राजेश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक जयराम कुंकळ्येकर यांच्या नेतृत्वाखाली पथकाने गुऊवारी मध्यरात्री 12.25 ते उत्तररात्री 2.30 दरम्यान संबंधित ठिकाणी सापळा रचला. दरम्यान एक युवक जीए-06-एसी-1617 क्रमांकाची दुचाकीसह त्या ठिकाणी आला. त्याला ताब्यात घेऊन त्याची कसून चौकशी केल्यावर पोलिस पथकाला त्याच्याकडे गांजा असल्याचे आढळून आले. त्याला अटक करून त्याच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
दुसऱ्या घटनेत धनवाडा साळगाव येथे पोलिसांनी ड्रग्स विरोधी कारवाईत संशयित दिनेश ऊपचंद कुमार याला अटक केली. त्याच्याकडून 2 लाख 80 हजार ऊपये किंमतीचा 280 ग्रॅम चरस जप्त केला. ही कारवाई साळगाव पोलिसांनी गुरूवार दि. 26 रोजी रात्री 11 ते शुक्रवार दि. 27 रोजी उत्तररात्री 2.20 च्या दरम्यान केली.
धनवाडा, साळगाव येथील फिल्ड साईड बार जवळ ड्रग्ज तस्करी व्यवहार होणार असल्याची माहिती पोलिसांना विश्वसनीय सूत्रांकडून मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी घटनास्थळी सापळा रचला व संशयिताला ताब्यात घेतले. झडतीवेळी त्याच्याजवळ 280 ग्रॅम चरस सापडला. पोलिसांनी अमली पदार्थ प्रतिबंधक कायद्याखाली गुन्हा नोंदवून संशयिताला अटक केली.
संशयित ड्रग्ज तस्करीच्या हेतूने गुरूवारी 26 रोजीच रेल्वेमार्गे गोव्यात दाखल झाला होता, अशी माहिती चौकशीतून उघडकीस आली आहे. निरीक्षक सोमनाथ माजिक यांच्या नेतृत्वाखाली उपनिरीक्षक अक्षय गावकर, दिशन नाईक, कॉन्स्टेबल श्रीकृष्ण रेडकर, राहुल आंगोलकर, विनोद कासार व तुळशीदास गावस या पथकाने ही कामगिरी केली. पुढील तपास अधीक्षक अक्षत कौशल व उपअधीक्षक विश्वेश कर्पे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस करत आहेत.