छत्तीसगडच्या महिलेकडून तब्बल 6.80 लाखाचा ड्रग्ज जप्त
पणजी : गुन्हा अन्वेषण विभागाच्या पोलिसांनी गिरी-म्हापसा येथे केलेल्या कारवाईत 6 लाख 80 हजार ऊपये किमतीचा ड्रग्ज जप्त केला असून छत्तीसगढ येथील महिलेला अटक करुन तिचा मोबाईलही फोन जप्त केला आहे. अटक केलेल्या महिलेचे नाव आशा अजय लाक्रा (40 वर्षे, मूळ छत्तीसगढ) असे आहे. ती गिरी येथे भाड्याच्या खोलीत राहत होती. गुन्हा अन्वेषण विभागाने अग्निवाडा-गिरी येथे संशयित महिला राहत असलेल्या भाड्याच्या खोलीत छापा मारला. रमाकांत कवठणकर यांच्या मालकीची ही खोली आहे.
खोलीत तपासणी केली असता या महिलेच्या पर्समधून पोलिसांना एमडीएमए आणि एक्टासीच्या तब्बल 268 गोळ्या मिळाल्या. गोळ्यांचे वजन 118.537 ग्राम असून आंतरराष्ट्रीय बाजार भावानुसार त्यांची किंमत 6 लाख 80 हजार ऊपये आहे. ही कारवाई गुन्हा अन्वेषण विभागाचे निरीक्षक लक्षी आमोणकर, उपनिरीक्षक गिरीश तुकाराम पडलोस्कर, महिला हवालदार स्नेहा जावेर, हवालदार इर्शाद वाटंगी, कॉन्स्टेबल नवीन पालयेंकर, कल्पेश शिरोडकर, महाबळेश्वर सावंत, अनिश तारी, कमलेश धारगळकर, रोशनी शिरोडकर यांनी केली आहे. याप्रकरणी गुन्हा अन्वेषण विभागाचे पोलीस अधीक्षक राहुल गुप्ता आणि उपअधीक्षक राजेश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुऊ आहे.