परवेझ अली खानकडून 25 लाखाचा ड्रग्ज जप्त
एएनसीची पत्रादेवी येथे कारवाई
पणजी : अमलीपदार्थ विरोधी विभागाने (एएनसी) पत्रादेवी येथे केलेल्या कारवाईत 25 लाख 10 हजार ऊपये किंमतीचा ड्रग्ज जप्त केला आहे. या प्रकरणात परवेझ अली खान (30, कुडाळ सिंधुदुर्ग) याला अटक केली असून एनडीपीएस कायद्याखाली गुन्हा नोंद केला आहे. महाराष्ट्रातून गोव्यात ड्रग्जसह येत असल्याची माहिती एएनसीला मिळाली होती. त्यानुसार एएनसी विभागाचे पोलिस पत्रादेवी चेकनाक्यावर सापळा रचून बसले होते. संशयित गोव्यात प्रवेश करीत असताना त्याला ताब्यात घेतले आणि त्याची कसून तपासणी केली असता त्याच्याकडे ड्रग्जच्या गोळ्या सापडल्या. संशयित परवेज खान हा आंतरराज्य ड्रग्ज टोळीमध्ये गुंतलेला असून तो गोवा व मुंबईतील ड्रग्ज पार्ट्यांना ड्रग्ज पुरवठा करीत असल्याचे प्राथमिक चौकशीत समोर आले आहे. सध्या तीन दिवसांची सुट्टी असल्याने गोव्यात मोठ्या प्रमाणात देशी पर्यटक गोव्यात आले आहेत. त्यामुळे तो हा ड्रग्ज गोव्यातील विविध भागातील ड्रग्ज विक्रेत्यांना पुरवठा करण्यासाठी गोव्यात येणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यामुळे गोव्याच्या हद्दीत संशयित घुसण्याआधीच त्याला पत्रादेवी येथील चेकनाक्यावर ताब्यात घेण्यात आले.