बेंगळुरात 23 कोटींचे ड्रग्ज जप्त
सीसीबी पोलिसांची कारवाई : आरोपी नायजेरियन नागरिक
प्रतिनिधी/ बेंगळूर
बेंगळूरच्या सीसीबी पोलिसांनी ड्रग्जविक्री विरोधातील मोहीम तीव्र केली असून नायजेरियन ड्रग्ज पेडलरच्या मुसक्या आवळल्या आहेत. त्याच्याकडून तब्बल 23 कोटी 74 लाख रुपयांचे अमली पदार्थ जप्त करण्यात आले आहे. इजीकी इंजीगो (वय 42) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. यलहंका येथील सातनूर रोडवर भाडोत्री घर घेऊन इजीकी इंजीगो ड्रग्ज विक्रीत गुंतला होता. त्याच्यावरील छाप्यात 11 किलो 640 ग्रॅम एमडीएमए क्रिस्टल्स, 1,040 एक्सटेन्सी गोळ्या, 2 किलो 235 ग्रॅम ड्रग्ज निर्मितीसाठी लागणारी सामुग्री, मोबाईल जप्त करण्यात आला आहे, अशी माहिती बेंगळूर शहर पोलीस आयुक्त सीमंतकुमार सिंग यांनी दिली.
सीसीबीच्या नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे अधिकारी व सहकाऱ्यांच्या पथकाने बागलूरजवळ जलद कारवाई करत ड्रग्जविक्रीचा पर्दाफाश केला. आरोपीविरुद्ध सीसीबी पोलीस स्थानकात गुन्हा नोंदवून पुढील तपास केला जात आहे. विदेशी नागरिकाला घर भाडोत्री देताना कायदेशीर नियमांचे पालन न केल्याबद्दल घरमालकाविरुद्धही कारवाई केली जाणार आहे. याबाबतचे निर्देश बागलूर पोलिसांना देण्यात आले आहेत.
यापूर्वी ड्रग्ज प्रकरणात कारावास
अटकेतील आरोपी 2017 मध्ये व्यावसायिक व्हिसा मिळवून श्रीलंकामार्गे भारतात आला होता. व्हिसाची मुदत संपल्यानंतरही तो बेंगळूरमध्ये बेकायदेशीरपणे वास्तव्यास होता. जलद पैसे मिळविण्यासाठी ड्रग्जविक्रीच्या तस्करीत तो गुंतला होता. 2019 मध्ये ड्रग्जविक्री प्रकरणात त्याला कारावास भोगावा लागता होता. 2020 मध्ये एनडीपीएस कायदा आणि विदेशी नागरिक नियमांच्या उल्लंघन प्रकरणी कोननकुंटे पोलिसात आणखी एक गुन्हा नोंदविण्यात आला होता.