गिरी- म्हापसा येथे 19 लाखाचा ड्रग्ज जप्त
उत्तर प्रदेशच्या संशयितास अटक
पणजी : अमलीपदार्थ विरोधी विभागाने (एएनसी) गिरी-म्हापसा येथील ग्रीन पार्क हॉटेलजवळ असलेल्या पुलाखाली छापा टाकून 19 लाख 30 हजार ऊपये किमतीचा ड्रग्ज पकडला आहे. या प्रकरणात एका संशयिताला अटक केली आहे. संशयिताच्या विरोधात एनडीपीएस कायद्याखाली गुन्हा नोंद करण्यात आला आहे. रिमांडसाठी न्यायालयात हजर केले असता त्याला चार दिवसांची पोलीस कोठडी ठोठावण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अटक केलेल्या संशयिताचे नाव मोहम्मद झाहीद फाऊकी (32, उत्तर प्रदेश) असे आहे. गिरी-म्हापसा येथील पुलाखाली एक युवक ड्रग्ज तस्करीसाठी येणार असल्याची माहिती एएनसीच्या अधिकाऱ्याला मिळाली होती. त्यानुसार एएनसी पोलिसांनी योग्य नियोजन करून कारवाई केली आणि संशयिताला शिताफिने अटक केली. संशयित ठरलेल्या ठिकाणी आला असता त्याला ताब्यात घेतले आणि त्याची कसून तपासणी केली असता त्याच्याकडे 193.49 ग्रॅम एमडीएमए सापडला. एएनसी पोलिसांनी त्वरित त्याला अटक करून त्याच्या विरोधात कारवाई केली.
पोलीस अधीक्षक अक्षत कौशल आणि उपअधीक्षक नॅर्लोन आल्बुकर्क यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सजिंत पिल्ले यांच्या नेतृत्वाखाली उपनिरीक्षक मंजुनाथ नाईक, सहाय्यक उपनिरीक्षक वासुदेव नाईक, कॉन्स्टेबल राहूल गावस, अमित साळुंके, सचिन सातोस्कर यांनी ही कारवाई केली असून पुढील तपास सुऊ आहे.