For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

अठराशे कोटीचे अमली पदार्थ जप्त

06:45 AM Apr 15, 2025 IST | Tarun Bharat Portal
अठराशे कोटीचे अमली पदार्थ जप्त
Advertisement

गुजरात सागरतटानजीक संयुक्त कारवाईला यश

Advertisement

वृत्तसंस्था / .गांधीनगर

गुजरात दहशतवादविरोधी दल आणि भारतीय तटरक्षक दल यांच्या संयुक्त कारवाईत 1800 कोटी रुपयांचे 300 किलो अमली पदार्थ जप्त करण्यात आले आहेत, अशी माहिती देण्यात आली आहे. ही कारवाई 12 आणि 12 एप्रिलमधील रात्री करण्यात आली. तटरक्षक दलाकडून सागर तटानजीकच्या प्रदेशात गस्त घालण्यात येत असताना हे अमली पदार्थ घेऊन येणाऱ्या नौकेतील खलाशांनी हे अमली पदार्थ समुद्रात फेकून दिले आणि आंतरराष्ट्रीय सागरी सीमेपलिकडे पोबारा केला. तटरक्षक दलाने नंतर हे अमली पदार्थ उथळ समुद्रातून बाहेर काढले आणि ते जप्त करण्यात आले. ते आणणाऱ्या नौकेचा शोध घेण्यात येत आहे.

Advertisement

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी या कारवाईचे कौतुक केले आहे. अमली पदार्थांचा बेकायदेशीर व्यापार उद्ध्वस्त करणे हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्र सरकारचे ध्येय आहे. त्याला अनुसरुन ही कारवाई करण्यात आली आहे. देशातील युवा पिढीच्या उज्ज्वल भवितव्यासाठी अमली पदार्थांचा व्यापार नष्ट करण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे आम्ही मोठ्या प्रमाणावर अशा कारवाया केल्या असून या घातक व्यापाराची पाळेमुळे उखडण्याला प्राधान्य देण्यात येत आहे, अशी माहिती अमित शहा यांनी आपल्या संदेशात दिली आहे.

अमली पदार्थमुक्त भारत अभियान

भारत सरकारने गेल्या काही वर्षांपासून अंमली पदार्थमुक्त भारत हे अभियान हाती घेतले आहे. त्याअंतर्गत देशातील अंमली पदार्थांच्या तस्करीविरोधात कठोर कारवाई करण्यात येत आहे. गुजरातचा सागरतट हा अमली पदार्थांच्या जगभरातील व्यापाराचे एक महत्त्वाचे स्थान आहे. त्यामुळे या परिसरावर सरकारने विशेष लक्ष देण्यासाठी गस्त वाढविली आहे. या उपाययोजनेचा परिणाम दिसू लागला आहे.

विक्रमी कारवाई

तटरक्षक दल, अमली पदार्थ नियंत्रण कक्ष आणि इतर केंद्रीय सुरक्षा संघटनांनी 2024 या वर्षात अमली पदार्थ जप्त करण्याचा विक्रम नोंदविला आहे. या 12 महिन्यांच्या कालावधीत 16 हजार 914 कोटी रुपयांचे अमली पदार्थ जप्त करुन नष्ट करण्यात आले आहेत. तसेच 2014 ते 2024 या दहा वर्षांच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्र सरकारच्या कालावधीत एकंदर 3 लाख 24 लाख किलो अमली पदार्थ जप्त करण्यात आले आहेत. 2004 ते 2014 या मागच्या सरकारच्या काळात हे प्रमाण केवळ 3.64 लाख किलो इतके होते. याचाच अर्थ असा की सध्याच्या केंद्र सरकारच्या कार्यकाळात मागच्या सरकारच्या तुलनेत साडेसातपट अधिक अमली पदार्थ जप्त करण्यात आले आहेत. त्यांची आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील किंमत 56 हजार 861 कोटी रुपये आहे. मागच्या मनमोहनसिंग सरकारच्या काळात सापडलेल्या अमली पदार्थांची किंमत 8 हजार कोटी रुपयांच्या आसपास होती, अशीही माहिती देण्यात आली आहे.

हा कठोर कारवाईचा परिणाम

मागच्या मनमोहनसिंग सरकारच्या तुलनेत अमली पदार्थ नियंत्रणाच्या संदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील सरकारची कारवाई साडेसातपट अधिक आहे. मात्र, याचा अर्थ भारतात अमली पदार्थांचा व्यापार वाढला आहे असा नसून आमच्या सरकारने अमली पदार्थ विरोधी कारवाईत जी तीव्रता आणली आहे, तिचा हा परिणाम आहे, असेही स्पष्टीकरण अमित शहा यांनी दिले आहे. विशेषत: सागरतटीय क्षेत्रांमध्ये आमच्या सरकारने गस्त मोठ्या प्रमाणात वाढविली आहे. त्यामुळे कितीतरी अधिक प्रमाणात अमली पदार्थ जप्त केले जात आहेत. यापुढच्या काळातही या कारवाईची तीव्रता अधिक वाढविली जाणार असून तशा प्रकारचे आदेश अमली पदार्थ नियंत्रणाशी संबंधित सर्व सुरक्षा संस्थांना आणि प्राधिकरणांना देण्यात आला आहे, अशी माहितीही अमित शहा यांनी दिली आहे.

Advertisement
Tags :

.