भोपाळमध्ये 1800 कोटीचे अमली पदार्थ जप्त
गुजरात एटीएस, एनसीबीची कारवाई : मध्यप्रदेशात खळबळ
वृत्तसंस्था/ भोपाळ
मध्यप्रदेशच्या भोपाळ येथील एका फॅक्टरीमधून अधिकाऱ्यांनी 1800 कोटी रुपयांचे मूल्य असलेले अमली पदार्थ आणि कच्चा माल रविवारी जप्त केला आहे. गुजरातचे गृहराज्यमंत्री हर्ष सांघवी यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील एका पोस्टद्वारे ही माहिती दिली आहे. तर दुसरीकडे पंजाबमध्ये 10 कोटी रुपयांचे मूल्य असलेले कोकेन जप्त करण्यात आले आहेत.
गुजरात एटीएस आणि नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो, दिल्लीकडून एका संयुक्त मोहिमेद्वारे हे अमली पदार्थ जप्त करण्यात आले आहेत. अमली पदार्थांच्या विरोधातील लढाईत मोठ्या विजयासाठी गुजरात एटीएस आणि एनसीबीचे अभिनंदन असे सांघवी यांनी म्हटले आहे.
अमली पदार्थांच्या तस्करीला रोखण्यात आणि समाजाच्या आरोग्य आणि सुरक्षेच्या रक्षणात कायदा अंमलबजावणी यंत्रणांची महत्त्वपूर्ण भूमिका आहे. रविवारची कारवाई अमली पदार्थांची तस्करी आणि त्याचे सेवन रोखण्यासाठीचे यंत्रणांचे अथक प्रयत्न दर्शविते असे उद्गार सांघवी यांनी काढले आहेत.
दिल्लीत बुधवारी पोलिसांनी मोठ्या प्रमाणातील अमली पदार्थ जप्त केले होते. अधिकाऱ्यांनी एका गोदामातून 560 किलोग्रॅमहून अधिक कोकेना अणि 40 किलोग्रॅम हायड्रोपोनिक मारिजुआना जप्त केला होता. या अमली पदार्थांची आंतरराष्ट्रीय बाजारातील मूल्य 5620 कोटी रुपये असल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले होते.