शिवोलीत 11.7 कोटीचे ड्रग्ज जप्त
पणजी : गोवा पोलिस खात्याच्या पोलिसांनी (एएनसी) शिवोली येथे केलेल्या कारवाईत तब्बल 11 कोटी 7 लाख ऊपये किंमतीचा ड्रग्ज जप्त केला आहे, अशी माहिती एएनसी अधीक्षक सुनिता सावंत यांनी दिली आहे. याप्रकरणी एका केरळीयन संशयिताला अटक केली आहे. संशयिताच्या विरोधात एनडीपीएस कायद्याखाली गुन्हा नोंद करून त्याला रिमांडसाठी न्यायालयात हजर केले असता सात दिवसांची पोलिस कोठडी ठोठावली आहे. काल मंगळवारी पोलिस मुख्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत अधीक्षक सुनिता सावंत बोलत होत्या. यावेळी त्यांच्या सोबत उपअधीक्षक नेरलॉन अल्बुकर्क, निरीक्षक सजित पिल्लई उपस्थित होते. अटक केलेल्या संशयिताचे नाव मोहम्मद समीर (29) असून तो पलक्कड, केरळचा मूळ रहिवासी असून गेल्या 5 वर्षांपासून गोव्यात राहत होता. संशयित सध्या बागा येथे एक गेस्ट हाऊस चालवत होता. तसेच दुचाकी, चारचाकी वाहने भाड्याने देत होता. त्याने बामणवाडा, शिवोली येथे घर भाड्याने घेतले असून त्या ठिकाणाहून तो ड्रग्जचा बेकायदेशीर व्यवसाय करीत होता, असे सुनिता सावंत यांनी सांगितले. मोहम्मद समीर यांच्याकडून एकूण 110 ग्रॅम द्रवऊपातील एलएसडी जप्त करण्यात आले आहे. या द्रवातून 10 ते 12 लाख एलएसडी पेपर तयार करता आले असते. प्रती पेपरचा दर 4 ते 5 हजार ऊपये इतका असतो, असे सावंत यांनी सांगितले.
संशयित ड्रग्ज व्यवसायात असल्याची माहिती पोलिसांना मिळताच त्यांनी संशयिताला रंगेहात पकडण्यासाठी सापळा रचला होता. सोमवारी रात्री शिवोली येथील घराच्या बाहेर ग्राहकाला ड्रग्ज देण्यासाठी आला असता त्याला रंगेहात पकडण्यात आले. त्याच्या ताब्यातून 4. 72 ग्रॅम अतिशक्तिशाली एलएसडी जप्त करुन त्याला अटक केली आहे. नंतर पोलिसांनी तो राहत असलेल्या घराची झडती घेतली असता त्यात 106 ग्रॅम मायक्रॉन एलएसडी द्रव्य तसेच 101 ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला. संशयित ड्रग्स थेंबात विकत होता. आवश्यकतेनुसार त्याच्या ग्राहकांना द्रव्य आणि आणखी पुरवठा करण्यासाठी ब्लॉटिंग पेपर्स बांधायचा. या ड्रग्जचा वापर मोठ्या पार्टीमध्ये होतो. जगातील सर्वात शक्तीशाली अमलीपदार्थापैकी एक एलएसडी सायकेडेलिक ड्रग्ज आहे. ही कारवाई एएनसी निरीक्षक सजित पिल्लई यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार उमेश देसाई, कॉन्स्टेबल गोदिश गोलतेकर, मकरंद घाडी, साईराज नाईक, व्यंकटेश माईणकर, अक्षय नाईक आणि विठ्ठल फडते यांनी केली असून उपअधीक्षक नेरलॉन अल्बुकर्क आणि अधीक्षक सुनिता सावंत यांच्या देखरेखीखाली पुढील तपास सुरू आहे.
लोकांनी सहकार्य करावे : सावंत
राज्यातील ड्रग्ज पूर्णपणे नष्ट करण्यासाठी पोलिस कटिबध आहेत. त्या दृष्टीने पोलिस काम करीत आहेत. लोकांनीही सहकार्य करावे, असे आवाहन सुनिता सावंत यांनी केले आहे. आपण राहत असलेल्या जवळपास ड्रग्जचा प्रकार सुरू असल्यास त्याची माहिती पोलिसांना द्यावी. पोलिस माहिती देणाऱ्याचे नाव गुप्त ठेवतील. गोवा सुरक्षित ठेवण्यासाठी तसेच ड्रग्जमुक्त करण्यासाठी सर्वांचा हातभार लागल्यास गोवा ड्रग्जमुक्त करण्यास वेळ लागणार नाही, असेही सुनिता सावंत यांनी सांगितले.