For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

बेंगळूरमध्ये 35 कोटींचे ड्रग्ज जप्त

06:23 AM May 21, 2026 IST | Tarun Bharat Portal
बेंगळूरमध्ये 35 कोटींचे ड्रग्ज जप्त
Advertisement

तीन विदेशी नागरिकांसह 8 जणांना अटक : बेंगळूर, दिल्ली, हरियाणात कारवाई

Advertisement

त. भा. प्रतिनिधी

बेंगळूर :

Advertisement

बेंगळूर शहर पोलिसांनी तीन विदेशी ड्रग्ज पेडलरांसह आठ जणांच्या मुसक्या आवळल्या असून, 35 कोटी रुपये किमतीचे एमडीएमए जप्त केले आहे. बेंगळूरसह दिल्ली, हरियाणा येथून आरोपींना अटक करण्यात आली असून या ड्रग्जपुरवठा व विक्रीच्या रॅकेटमध्ये सामील असलेल्या आणखी काही आरोपींचा शोध जारी आहे.

अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये नवी दिल्लीतील नलोटिया येथील रीना यादव (50), राजौरी गार्डन येथील देबाशीष बॅनर्जी (66), कर्नाटकातील बेळतंगडी येथील जिम ट्रेनर मोहम्मद मन्सूर (30), सेनेगल देशातील डॉनपा गार्लंड (39), टांझानियातील मार्गारेट चॅले (36), नवी दिल्ली दक्षिण जिल्ह्यातील धीरज (33), नायजेरियातील ओबिंजू रीटा (34) आणि मंगळूर जिल्ह्याच्या बंटवाळ येथील अब्दुल समीद (38) यांचा समावेश आहे. त्यांच्याकडून 35 कोटी रुपये किमतीचे 17 किलो 500 ग्रॅम एमडीएमए, 4 मोबाईल आणि दोन कार जप्त करण्यात आल्या आहेत, अशी माहिती बेंगळूर शहर पोलीस आयुक्त सीमंतकुमार सिंग यांनी पत्रकार परिषदेत दिली.

11 मे रोजी बेंगळूरच्या हेब्बाळ पोलीस स्थानकाला खबऱ्यांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे आनंदनगरमधील उन्नती लेआउट मेन रोडवरील एका अपार्टमेंटसमोर कारमध्ये बसून ड्रग्ज विकणाऱ्या तिघांना अटक करण्यात आली. या तिघांनी दिल्लीतील अज्ञात व्यक्तीकडून कमी किमतीत एमडीएमए खरेदी करून बेंगळूरमध्ये विक्री करत असल्याची कबुली दिली. त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरण्यात आलेली कार, 4.18 किलो एमडीएमए आणि चार मोबाईल जप्त करण्यात आले.

त्यांच्या चौकशीतून मिळालेल्या माहितीच्या आधारे चिक्कनायकानहळ्ळी येथील एका आरोपीच्या घरात एमडीएमएचा अतिरिक्त साठा ठेवण्यात आल्याचे छाप्यातून उघड झाले. 14 मे रोजी पोलिसांनी घटनास्थळावरून 10.12 किलो एमडीएमए जप्त केले. नंतर, हरियाणा आणि दिल्लीमध्ये विविध कारवाईत चार जणांना अटक करण्यात आली. अटक केलेल्यांपैकी तिघे विदेशी नागरिक असून, त्यात दोन महिलांचा समावेश आहे.

17 मे रोजी चारही आरोपींना दिल्लीतील स्थानिक न्यायालयात हजर करण्यात आले. पोलिसांनी त्यांना ट्रान्झिट वॉरंटवर बेंगळूरला आणले. चौकशीदरम्यान, या रॅकेटमध्ये आणखी एका व्यक्तीचा सहभाग असल्याचे पोलिसांना समजले. त्यानुसार, 18 मे रोजी बेंगळूरच्या हेन्नूरमधील एका रुग्णालयाजवळून आठव्या आरोपीला अटक करण्यात आली. त्याच्या घरातून 3.2 किलो एमडीएमए जप्त करण्यात आले. या प्रकरणातील आणखी काही जण फरार असून, त्यांचा शोध सुरू आहे, असे तपास अधिकाऱ्याने सांगितले.

Advertisement
Tags :

.