ड्रग्ज इंजेक्शन रॅकेटचा पर्दाफाश
सातारा :
सातारा शहरामध्ये नशेसाठी वापरण्यात येणारे ड्रग्ज इंजेक्शन रॅकेटचा पर्दापाश करण्यात सातारा शहर पोलीस ठाण्याच्या डी. बी. पथकाला यश आले आहे. या रॅकेटमध्ये 5 संशयित आरोपींना अटक करून त्यांच्याकडून 5 लाख 15 हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. शिवराज पंकज कणसे (वय 24, रा. शाहुनगर, गोडोली, सातारा), साईकुमार महादेव बनसोडे (वय 25, रा. भोसे, ता. पंढरपूर, जि. सोलापूर), सुदीप संजय मेंगळे (वय 19, रा. सदरबझार, सातारा), अतुल विलास ठोंबरे (वय 20, रा. शाहुपूरी सातारा), तय्यब हाफीस खान (वय 23, रा. गोरेगाव, मुंबई) अशी आरोपींची नावे आहेत. यामध्ये सोलापूर जिल्ह्यातील साईकुमार बनसोडे या शिकाऊ डॉक्टरचाही समावेश आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सातारा शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र म्हस्के यांनी सातारा शहरातील चारभिंती, सदरबझार परिसरामध्ये काही महिन्यापासून नशेसाठी वापरण्यात येणारे ड्रग्ज इंजेक्शन आढळून आले होते. त्याअनुशंगाने सातारा शहर डी. बी. पथकातील पोलीस अधिकारी व अंमलदार यांना याबाबत माहिती घेवून त्यांच्यावर कारवाई करण्याबाबत सूचना दिलेल्या होत्या. त्याप्रमाणे सातारा शहर डी. बी. पथकाने नशा करणारा युवक शिवराज कणसेवर गेल्या दोन महिन्यापासून लक्ष ठेवून होते. परंतू शिवराज आपण सापडू नाही याकरिता आपले नाव व ओळख समोर येवू नये याबाबत अत्यंत दक्षता बाळगत होता. परंतू डी. बी. पथकाने सलग दोन महिने चिकाटीने गोपनीय माहिती प्राप्त करून सदर माल सातारा शहरामध्ये पुरविणाऱ्या युवकाची माहिती प्राप्त केली. परंतु शिवराज अत्यंत चातुर्याने या मालाची चोरटी विक्री करीत असल्याचे समजून आले. त्याच्या हालचालीबाबत सातत्याने लक्ष ठेवून व तांत्रिक माहिती प्राप्त करून तो दि. 2 मे रोजी तो चारभिंती परिसरामध्ये माल विकी करण्यासाठी येणार असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी चारभिंती परिसरामध्ये सापळा रचला होता. मिळालेल्या माहितीप्रमाणे शिवराज हा चारभिंती परिसरामध्ये एका बंद टपरीच्या आडोशास संशयास्पदरित्या आढळून आल्याने त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले.
त्याचे नाव, गाव याबाबत माहिती घेवून त्याच्या गाडीची व त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे नशेसाठी वापरण्यात येणाऱ्या इंजेक्शनच्या बेकायदेशीर 30 बाटल्या मिळून आल्या. त्याच्याकडे या बाटल्या विषयी चौकशी केली असता त्याने प्रथम उडवाउडवीची उत्तरे दिली. त्याला अटक करून त्याची पोलीस रिमांड घेवून त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता त्याने हे इंजेक्शन मुंबई येथून तय्यब खान याच्याकडून चोरट्या पद्धतीने खरेदी करत असल्याचे सांगितले.
व ते प्राप्त झाल्यावर त्याने अन्य साथीदारांना ते थोड्या थोड्या प्रमाणात देवून त्याचा सप्लाय नशा करणाऱ्या युवकांकडे चोरून पोहोच करीत असल्याचे सांगितले. हा माल पोहोच करीत असताना तो सहजासहजी कोणाच्या समोर येत नव्हता. त्याच्या विश्वासू लोकांनाच याची माहिती देत होता.
सप्लाय करणाऱ्या तीन युवकांना देखील पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यापैकी साईकुमार बनसोडे (रा. भोसे, ता. पंढरपूर, जि. सोलापूर) हा शिकाऊ डॉक्टर असल्याचे तपासात निष्पन्न झाले. या चारही युवकांना अटक करण्यात आलेली आहे. मुंबई येथून ज्याठिकाणाहून सप्लाय होत होता. तेथून तय्यब खानला पोलिसांनी तांत्रिक माहितीच्या आधारे ताब्यात घेतले. तय्यब खान हा देखील चोरट्या पद्धतीने थोड्या थोड्या प्रमाणात माल प्राप्त करीत असल्याचे समजून आले. त्याच्याकडून देखील सदर इंजेक्शनच्या 30 बाटल्यांचा साठा मिळून आल्याने त्यास देखील ताब्यात घेवून अटक करण्यात आलेली आहे. या गुन्ह्याचा अधिक तपास सुरू असून या गुन्ह्यामध्ये 5 लाख 15 हजार रुपयांचा माल जप्त करण्यात आलेला आहे.
ही कारवाई पोलीस अधिक्षक समीर शेख, अप्पर पोलीस अधिक्षक डॉ. वैशाली कडूकर, उपविभागीय अधिकारी सातारा विभाग सातारा राजीव नवले, वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मस्के यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्याम काळे, पोलीस उपनिरीक्षक डी. एस. देवकर, सुधीर मोरे, पोलीस हवालदार निलेश यादव, सुजीत भोसले, निलेश जाधव, विक्रम माने, पोलीस नाईक पंकज मोहिते, पोलीस कॉन्स्टेबल इरफान मुलाणी, तुषार भोसले, सागर गायकवाड, सचिन रिटे, संतोष घाडगे, विशाल धुमाळ, मच्छिंद्रनाथ माने, सुशांत कदम यांनी सुहास कदम केलेली आहे.