‘नशामुक्त भारत’ ही देशव्यापी लोक चळवळ
केंद्रीय मंत्री डॉ. वीरेंद्र कुमार यांचे प्रतिपादन : बांबोळीत ‘नशामुक्त भारत’ कार्यक्रम
पणजी : ‘नशामुक्त भारत’ अभियान ही केवळ एक मोहीम नसून युवकांचे संरक्षण, कुटुंबांचे व समाजाचे सशक्तीकरण या हेतूने सुरू केलेली ती देशव्यापी लोकचळवळ आहे. केंद्र आणि राज्य सरकारे, शैक्षणिक संस्था, कायदे अंमलबजावणी यंत्रणा आणि सामाजिक संस्था या सर्वांच्या एकत्रित प्रयत्नांतून नशामुक्त युवा पिढी घडविण्याचा आमचा विचार असून, यासाठी स्वयंसेवक, अशासकीय संस्था, सरकारी विभाग आणि धार्मिक संघटनांचा या मोहिमेतील सहभाग मोठा आहे. विविध क्षेत्रांतील लोकांना एकत्र आणून हा मोठा कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल गोवा राज्याचे मी कौतुक करतो, असे केंद्रीय सामाजिक न्याय व सक्षमीकरण खात्याचे मंत्री डॉ. वीरेंद्र कुमार यांनी सांगितले.
सामाजिक न्याय व सक्षमीकरण मंत्रालयाने गोवा सरकारच्या सामाजिक कल्याण मंत्रालयाच्या सहकार्याने बांबोळी येथील डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी मैदानावर घेण्यात आलेल्या ‘नशामुक्त भारत’ या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, समाज कल्याण खात्याचे मंत्री सुभाष फळदेसाई, केंद्रीय सामाजिक न्याय व सक्षमीकरण मंत्रालयाचे सचिव सुधांश पंत, गोवा सरकारचे सामाजिक कल्याण सचिव सरप्रीत सिंह गिल, उपमहासंचालक प्रतिमा गुप्ता उपस्थित होते. ‘नशामुक्त भारत, खुशहाल भारत’ या संकल्पनेंतर्गत नशामुक्त भारत अभियानाच्या पाचव्या वर्धापन दिनानिमित्त हा कार्यक्रम राज्यात आयोजित केला होता.
या कार्यक्रमात धोरणकर्ते, युवक, नागरी संस्थांचे प्रतिनिधी, विद्यार्थी आणि अन्य संबंधितांनी अमलीपदार्थमुक्त भारताचा निर्धार सामूहिकरित्या व्यक्त केला. या कार्यक्रमात केंद्रीय मंत्री डॉ. वीरेंद्र कुमार यांनी उपस्थितांना अमलीपदार्थ सेवनविरोधी शपथ दिली. अमलीपदार्थांचा गैरवापर रोखण्यात नागरिकांनी सक्रिय सहभाग घ्यावा आणि सतर्क राहावे असे आवाहन त्यांनी केले. या कार्यक्रमात ‘एनएमबीए’ या विषयावर आधारित सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
यामध्ये देखणी नृत्य आणि पथनाट्याचा समावेश होता. या सादरीकरणांद्वारे अमलीपदार्थांच्या दुष्परिणामांबाबत जनजागृती करण्यात आली आणि सामूहिक कृतीचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले. या अभियानात योगदान दिल्याबद्दल मान्यवर व्यक्ती, व्यसनमुक्त झालेले व्यक्ती, प्रमुख स्वयंसेवक आणि विविध स्पर्धांचे विजेते यांचा सत्कार करण्यात आला. दरम्यान, फोंड्यातील पीईएस रवी नाईक महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी पथनाट्या सादर करून नशा मुक्तीचा संदेश दिला. कार्यक्रमाच्या पूर्वसंध्येला जनजागृती आणि लोकांचा पाठिंबा मिळविण्यासाठी युवक रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीद्वारे ‘नशामुक्त भारत अभियान‘ (एनएमबीए) अंतर्गत अमलीपदार्थांविरोधात एकजुटीने उभे राहण्याचा संदेश अधिक दृढ करण्यात आला.
विकसित भारतासाठी व्यसनापासून दूर रहा : फळदेसाई
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दूरदृष्टीचे नेते आहेत. देशाचा अभिमान आणि जगाच्या पातळीवर जी ओळख निर्माण झाली आहे, त्यांचा जगात आदर केला जातो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी युवकांना मध्य ठेवल्यामुळे ‘नशामुक्त भारत’ ही चळवळ तथा अभियान सुरू केले आहे. 2047 सालातील विकसित भारताचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रत्येकाने व्यसनापासून दूर रहावे, यातच तुमचे हित आहे. स्वयंपूर्ण गोवा हे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचे स्वप्न आहे आणि हे स्वप्न आता पूर्णत्वाच्या दिशेने सुरू आहे. म्हणून ‘नशामुक्त भारत’ हे अभियान तळागाळापर्यंत पोहचणे आपले कर्तव्य आहे, असे समाज कल्याण खात्याचे मंत्री सुभाष फळदेसाई यांनी सांगितले.