हैदराबादमधील शाळेत ‘ड्रग्ज फॅक्टरी’ उघडकीस
संचालकासह तिघांवर अटकेची कारवाई
वृत्तसंस्था/ हैदराबाद
तेलंगणातील हैदराबादमध्ये पोलिसांनी शनिवारी एका खासगी शाळेतील ड्रग्ज फॅक्टरी उघडकीस आणली. याप्रकरणी मेधा स्कूल नावाच्या शाळेच्या संचालक मालेला जया प्रकाश गौड यांच्यासह तिघांना अटक करण्यात आली आहे. आरोपींनी शाळेतील वर्गखोल्या आणि प्रतिबंधित क्षेत्रे अल्प्राझोलमच्या उत्पादन कारखान्यात रुपांतरित केली होती. अल्प्राझोलमचा वापर ताडी बनवण्यासाठी केला जातो. हा एक अमली पदार्थ असून त्यावर तेलंगणामध्ये बंदी आहे.
शाळा इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर सुमारे सहा महिन्यांपासून कारखाना चालू होता. तळमजल्यावर आणि पहिल्या मजल्यावर वर्ग भरले जात होते. कारखान्यात आठवड्यातील सहा दिवस ड्रग्ज बनवले जात होते. त्यानंतर ते रविवारी बाहेर नेले जात होते, असे प्राथमिक चौकशीत स्पष्ट झाले आहे. ड्रग्ज कारखान्यावरील ही कारवाई तेलंगणा पोलिसांच्या एलिट अॅक्शन ग्रुप फॉर ड्रग्ज लॉ एन्फोर्समेंटने केली. पथकाने 7 किलोपेक्षा जास्त अल्प्राझोलम, 21 लाख रुपये रोख, मोठ्या प्रमाणात रसायने आणि उत्पादन साहित्य जप्त केले आहे.