ग्रेटर नोयडात अंमली पदार्थ साठा हस्तगत
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
उत्तर प्रदेशातील ग्रेटर नोयडा भागात पोलिसांनी एका बेकायदेशीर अंमली पदार्थ निर्मिती केंद्रावर धाड टाकून 95 किलोचा अंमली पदार्थ साठा जप्त केला आहे. हे केंद्र तिहार कारागृहातील एक कर्मचारी चालवत होता. 25 ऑक्टोबरला ही धाड टाकण्यात आली होती. तिची माहिती मंगळवारी प्रसिद्ध करण्यात आली.
हे केंद्र चालविण्यात या कर्मचाऱ्याला दिल्लीतील एका उद्योगपतीचे आणि मुंबईतील एका औषध विक्रेत्याचे पाठबळ मिळत होते, अशी माहिती प्राथमिक तपासातून उघड झाली आहे. गुप्तचरांनी या गुप्तपणे चालविल्या जाणाऱ्या अंमली पदार्थ उत्पादन केंद्राची माहिती पोलिसांना दिली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी धाड टाकून हे केंद्र सील केले असून 95 किलो अंमली पदार्थ जप्त केले आहेत. या पदार्थांची आंतरराष्ट्रीय बाजारात किंमत 1 हजार कोटी रुपये आहे.
रासायनिक पदार्थ
या धाडीत जे अंमली पदार्थ जप्त करण्यात आले, ते मेथांफेटामाईन या नावाने ओळखले जातात. हे सेंथेटिक ड्रग या प्रकारात मोडतात. कच्च्या मालापासून यांची निर्मिती प्रयोगशाळांमध्ये केली जाते. देशात अशा प्रकारच्या अंमली पदार्थांच्या उत्पादनाला आणि विक्रीला बंदी आहे. या अंमली पदार्थाच्या निर्मितीला आवश्यक असणाऱ्या रासायनिक पदार्थांचा पुरवठा दिल्लीच्या एका उद्योगपतीकडून केला जात होता. तसेच या कच्च्या मालापासून अंमली पदार्थाची निर्मिती केली जाणाऱ्या प्रक्रियेवर मुंबईचा एक औषध विक्रेता लक्ष ठेवीत होता, अशी माहिती देण्यात आली. या तीन्ही सूत्रधारांना लवकरच अटक करण्यात येईल, असे स्पष्ट करण्यात आले. अलिकडच्या काळात जप्त करण्यात आलेल्या अंमली पदार्थांच्या साठ्यांमध्ये या साठ्याचा क्रमांक चौथा आहे. गेल्या दोन आठवड्यांमध्ये दिल्ली पोलिसांनी 20 हजार कोटी रुपयांचे अंमली पदार्थ हस्तगत केले असल्याचे दिसून येत आहे.