कडेगाव तालुक्यात धक्कादायक प्रकार! जीवनावश्यक औषधांचा अल्पवयीन मुलांकडून नशेसाठी वापर
कडेगाव तालुक्यात नशेचे सावट;
कडेगाव : जीवनावश्यक औषधांपैकी काही औषधांचा अल्पवयीन मुलांकडून नशा येण्यासाठी वापर केला जात असल्याची चर्चा आहे.नशेच्या आहारी जाणाऱ्या अल्पवयीन मुलांकडून गुन्हेगारी कृत्ये वाढू लागल्याचे दिसून येते. त्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषधांची विक्री करणाऱ्यांवर कारवाई होणे गरजेचे आहे. तालुक्यात युवा पिढी मागील काहीवर्षांत नशेच्या आहारी जाण्याचे प्रमाण वाढत आहे. कडेगांव शहर, तालुक्यातीलत ग्रामीण विभागासह शाळगाव, नेवरी, देवराष्टे, विभागातील शालेय विद्यार्थ्यांसह मुलांमध्ये जागृती गरजेची आहे.
शहरी व ग्रामीण परिसरातील काही औषध विक्रेत्यांकडून डॉक्टरांची चिट्ठी अथवा सल्ल्याशिवाय काही औषधे विक्री केली जातात आणि युवा पिढीकडून त्याचा नशेसाठी वापर केला जात असल्याचे बोलले जात आहे. जीवनावश्यक औषधांमध्ये काही औषधांचा नशेसाठी वापरकेला जात असल्याची चर्चा आहे. त्यामध्ये अल्पवयीन मुलांचा सहभाग कमालीचा वाढल्याने अशा नशिल्या औषधांचा वापर करून त्यांच्याकडून गुन्हेगारी कृत्ये केली जात आहेत.
चिंचणी वांगी परीसरात यापूर्वी गांजा तस्करी उघडकीस आणण्यास पोलिसांना यश आले आहे. मात्र अजूनही पूर्णपणे पायबंद घालण्यात यश आले नाही. शिक्षक, पालकांकडून विद्यार्थ्यांमध्ये जागृती होणे गरजेचे आहे. काही युवक हव्यासापोटी अलगदपणे गांजा विक्रीसह गुन्हेगारी कृत्यात सहभागी होतात.