बुडता हे जन...
आषाढीची वारी म्हणजे चैतन्याचा, आनंदाचा सोहळा. पावसाळ्यातील जलधारांमुळे हा आनंद अधिक द्विगुणित होतो. किंबहुना अतिवृष्टी व इंद्रायणीच्या महापुराने तुकोबा व माउलींच्या प्रस्थान सोहळ्यावर यंदा बऱ्याच मर्यादा आलेल्या दिसतात. खरे तर या माध्यमातून पवित्र इंद्रायणीच्या प्रदूषणाचा व अतिक्रमणांचा मुद्दाही ऐरणीवर आला आहे. मावळ, देहू, आळंदी, चिखली व इंद्रायणी खोऱ्यातील पूरस्थितीतून ‘बुडता हे जन न देखवे डोळा ।’ या तुकोबारायांच्या ओळींचाच प्रत्यय येतो.
संतशिरोमणी जगद्गुरू तुकोबारायांच्या पालखी सोहळ्याचे पंढरपूरच्या दिशेने देहूतून मंगळवारी प्रस्थान झाले. तर संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माउलींच्या पालखी सोहळ्याचेही मोजक्या वारकरी, मानकरी व मान्यवरांच्या उपस्थितीत बुधवारी प्रस्थान होत आहे. दरवर्षी लाखो वारकरी विठुरायाच्या आत्मिक लळ्यापोटी आषाढी वारीत सहभागी होतात. देहू वा आळंदीतून वारीचा श्रीगणेशा करणे, हा बहुसंख्य वारकऱ्यांचा नित्यनेम आहे. पंढरीचा वारकरी । वारी चुको नेदी हरी ।। ही त्यामागची भावना. परंतु, यंदा इच्छा असतानाही वारकऱ्यांना पूरस्थितीमुळे देहू वा आळंदीत पोहोचता आले नाही. ही दोन्ही तीर्थक्षेत्रे पवित्र इंद्रायणी नदीच्या सान्निध्यात आहेत. वारकरी संप्रदायात इंद्रायणीला अतिशय मानाचे स्थान आहे. इंद्रायणी स्नान करिता प्रदक्षिणा । तुटती यातना । सकळांच्या ।। अशा शब्दांत या जीवनसरितेचे माहात्म्य वर्णिले जाते. परंतु, मागच्या काही दिवसांपासून इंद्रायणीच्या प्रदूषणाचा व अतिक्रमणाचा प्रश्न अतिशय गंभीर बनला आहे. लोणावळ्यातील कुरवंडे येथील उगमस्थानापासून ते तुळापरपर्यंतच्या भीमा संगमापर्यंतचा नदीचा प्रवास पाहिला, तर ठिकठिकाणी तिच्या मार्गात बाधा आणल्याचे दृश्य पहायला मिळते. तळेगाव औद्योगिक पट्ट्यातील रसायनमिश्रित पाणी, पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या हद्दीत सोडण्यात येणारे विनाप्रक्रिया सांडपाणी, मोशी कचरा डेपो प्रकल्पातील विनाप्रक्रिया लीचेट सांडपाण्यासह प्रदुषित ओढानाल्यांचे विष पचवत ही नदी पुढे जाते. त्यामुळे फेसाळती इंद्रायणी पाहणे वा तिच्या पाण्याची दुर्गंधी अनुभवणे, हे आता नित्याचेच झाले आहे. अगदी महापुरापूर्वी काल परवाच इंद्रायणीवरील फेसाचे दर्शन सर्वांना घडले. अशा प्रदुषित पाण्यात वारकरी व भाविक बांधव आजही श्रद्धेने स्नान करतात. पण, त्यांच्या आरोग्याचे काय, हा प्रश्न आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, महापालिकादी यंत्रणा तसेच शासन, प्रशासनाने याचे उत्तर दिले पाहिजे. इंद्रायणीचे प्रदूषण दूर करण्यासाठी ‘नमामि इंद्रायणी’सारखा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आणण्यात आला. त्याकरिता कोट्यावधी रुपयांचा निधीही मंजूर झाला. मात्र, या मायमाउलीची परवड काही संपलेली नाही, ही शोकांतिकाच. हे सगळे कमी म्हणून की काय इंद्रायणीला अनेक ठिकाणी अतिक्रमणांचा विळखा पडल्याचेही दिसते. त्यामुळे इंद्रायणीच्या महापुराला हे सगळे घटकही जबाबदार ठरतात. मागच्या 24 तासांत मावळात 625 इतक्या विक्रमी पावसाची नोंद झाली. तर देहू, आळंदी व पिंपरी चिंचवड परिसरातही 200 मिमीच्या आसपास पाऊस नोंदविण्यात आला. ही अतिवृष्टी विचारात घेता पूर स्वाभाविकच. तथापि, महापुरास मानवी हस्तक्षेपही कारणीभूत आहे, हे लक्षात घेतले पाहिजे. अतिवृष्टीमध्ये देहू, आळंदीमार्गावरील तळवडे, चिखली, मोशी गावच्या काही भागातही हाहाकार उडाला. अनेक घरांमध्ये व सोसायट्यांमध्ये पाणी शिरले. नैसर्गिक ओढे वा प्रवाह बुजवणे, वळवणे किंवा आकुंचित करणे, अंतर्गत रस्त्यांचे काँक्रिटीकरण, नालेसफाईकडे झालेले दुर्लक्ष, दाट लोकवस्तीच्या तुलनेत असलेली अपुरी यंत्रणा याचाही हा परिणाम म्हणता येईल. पुण्याच्या तुलनेत पिंपरी चिंचवड औद्योगिक पट्टा नियोजनबद्ध मानला जातो. मात्र, वारीमार्गावरील निगडी येथील भक्ती-शक्ती चौकातील भुयारी मार्गात एखाद्या विक्राळ नदीप्रमाणे पाण्याचा प्रवाह पहायला मिळतो, यातच सारे आले. मुख्य म्हणजे या आपत्तीमुळे निगडीपासून दुसरा मुक्काम असलेल्या आकुर्डीपर्यंतचा मार्गही बंद करावा लागला. उद्योगनगरीतील जवळपास 5 हजार लोक अतिवृष्टीने बाधित झाले. भस्मासुरी विकासात शहरे आणि तेथील जनता कशी बुडत आहे, याचेच हे निदर्शक. यातून बोध घेण्याची सद्बुद्धी ज्ञानोबा-तुकोबांनी राज्यकर्त्यांना द्यावी, हीच प्रार्थना.